Thursday, December 5 2024 6:26 am

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री

मुंबई, १७- राज्यातील औषध विक्रेत्यांना सुरळीतपणे व्यवसाय करता यावा, हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यस्तरावर औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिल्या.

राज्यातील औषध विक्रेत्यांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड, बंदर विकास मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासनाचे वरीष्ठ अधिकारी आणि औषध विक्रेत्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, औषध विक्रेता हे समाजाचा महत्वाचा घटक आहेत, त्यांना व्यवसाय करतांना येणाऱ्या जाचक अटी दूर करायला हव्यात. राज्यात कुठे बोगस औषधांची विक्री होत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाया कराव्यात. त्याचवेळी इतर औषध विक्रेत्यांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी औषध विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी संबधितांना सूचना दिल्या.