Sunday, November 18 2018 9:41 pm

औरंगाबाद मध्ये कचरा प्रश्नावर राष्ट्रवादी कांग्रेसचे कचरा फेको आंदोलन

औरंगाबाद – शहरातील कचऱ्याची कोंडी मागील नऊ दिवसांपासून महापालिका प्रशासन व राज्यकर्त्यांना सोडविता आला नाही. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून प्रशासन, पदाधिकारी अद्याप गंभीर नसल्याचा निषेध करीत शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारातच “कचरा फेको’ आंदोलन केले. शहरात सुमारे तीन ते साडेतीन हजार टन कचऱ्याचे ढिगारे वेगवेगळ्या भागांत पडून आहेत. नऊ दिवस उलटले तरी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांना कचऱ्याची कोंडी फोडता आली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. पालकमंत्री ते मुख्यमंत्री चा प्रवास करूनसुद्धा शहराची कचराकोंडी फुटलेली नाही त्यामुळे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने शनिवारी महापालिकेसमोर आंदोलन करीत कचरा फेकला. शहर जिल्हा अध्यक्ष दत्ता भांगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शहरात साचलेला कचरा एका रिक्षाने आणून महापालिका गेटवर फेकला. या वेळी महापालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. येत्या दोन दिवसांत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर महापौर व आयुक्तांच्या बंगल्यावर कचरा फेकू, असा इशारा श्री. भांगे यांनी या वेळी दिला