Monday, June 1 2020 2:24 pm

औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्तांची बदली

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली झाली आहे. तर कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त पी. वेलारासू यांचीही बदली करण्यात आली आहे. दोन्ही महापालिका आयुक्तांना आपापल्या पालिका क्षेत्रातील कचरा प्रश्न भोवल्याची चिन्हं आहेत.२९  दिवसांनंतरही औरंगाबादेतील कचरा प्रश्न कायम आहे. मुगळीकरांना वैधानिक विकास महामंडळाचं सचिवपद देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.कचराकोंडीवरुन विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात याची घोषणा केली होती.काही दिवसांपूर्वी औरंगाबाद कचरा प्रश्नाला हिंसक वळण लागलं होतं. मिटमिटा आणि पडेगावमध्ये कचऱ्याच्या गाड्या पेटवल्याने पोलिसांनी गावकऱ्यांच्या घरावर दगडफेक केली होती.

दुसरीकडे, पी. वेलारासू यांनी कल्याण-डोंबिवलीतील कचऱ्याचा प्रश्न हाताळताना अत्यंत हलगर्जी दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. स्थानिक रहिवाशांनी डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीची तक्रार केल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल तर घर सोडून दुसरीकडे रहायला जा, असा अजब सल्ला आयुक्तांनी दिला होता.संतप्त झालेल्या कल्याणकरांनी येत्या 19 मार्च रोजी वेलारासूंविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी शिवसेना नगरसेवकांसोबतही वेलारासू यांचा वाद झाला होता. शिवसेना नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात जाऊन त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं.