Saturday, November 16 2019 4:36 am
ताजी बातमी

ओव्हरलोडमुळे अर्नाळा येथील रोहित्रात तीनवेळा बिघाड

मुंबई :- विरार भागातील अर्नाळा येथील ३२५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरून सुमारे ६३० वीजग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. यापैकी बहुतांश वीजग्राहक मत्स्यव्यावसायिक आहेत. पुढील काही दिवसांत त्यांचा व्यवसाय सुरू होत असल्याने यातील बहुतांश वीजग्राहकांनी आपल्या बोटीवरील बॅटरी एकाच वेळेस चार्जिंगकरिता लावल्या. परिणामी रोहित्रावरील भार वाढून रोहित्र तीन वेळा नादुरुस्त झाले. यावेळी नादुस्तीचे कारण शोधण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन रोहित्र बिघाडाचा शोध घेतला असता वरील वस्तुस्थिती आढळून आली. अर्नाळा येथील ६०० ग्राहकांपैकी २०३ ग्राहकांकडे १२ लाखाची थकबाकी असून ती न भरल्यास महावितरणने करवाईचा ईशारा दिला आहे.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन ते दुरुस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला. याशिवाय या भागातील ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळावी म्हणून महावितरणकडून अर्नाळा येथे लवकरच अजून एक रोहित्र उभारण्यात येणार आहे.
एकाचवेळेस मोठ्या प्रमाणात रोहित्रावरील भार वाढल्यामुळे रोहित्र नादुरुस्त होतात. ग्राहकांनी याची जाणीव ठेवून महावितरणला सहकार्य करावे आणि अनधिकृत वीजवापर थांबवावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.