ठाणे,29:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. 150 ऐरोली विधानसभा कार्यक्षेत्रात आज (28 ऑक्टोबर) भरारी पथक क्रमांक एस.एस.टी 7 यांनी शीळ पोलीस चौकी चेक पोस्ट येथे शीळमार्गे बदलापूर येथून आलेल्या वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये पाच लाख रुपयांची रोकड आढळून आली असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
याबाबत या गाडीचे वाहनचालक शैलेश बसप्पा तलवार यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गाडीत सापडलेली रक्कम त्यांचे मित्र विक्रम स्वामी यांनी गिफ्ट आणण्याकरिता दिल्याचे सांगितले. विक्रम स्वामी यांचा मेसर्स इनफिनिट कन्स्ट्रक्शन या नावाने रियल इस्टेटचा व्यवसाय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहनचालक शैलेश तलवार हे फेअर एक्सपोर्ट प्रा.लि. वाशी येथे संचालक असून त्यांना विक्रम स्वामी यांनी गिफ्ट आणण्यासाठी रोख रक्कम दिल्याचे सांगितले. परंतू वाहनचालक शैलेश तलवार यांना याबाबत कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाही.
या गाडीत आढळून आलेली पाच लाखाची रोख रक्कम भरारी पथकाने कार्यालयात सीलबंद केली असून याबाबत अधिक तपासणी करण्यासाठी महसूल सहायक तुकाराम गवळी यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कदम यांनी ठाणे जिल्हा कोषागार अधिकारी श्री.महेशकुमार कारंडे यांना कळविले आहे.