Saturday, November 16 2019 5:05 am
ताजी बातमी

ऐतिहासिक नारळीपौर्णिमा उत्साहात साजरी – महापौरांच्या हस्ते मानाचा नारळ दर्याला अर्पण 

ठाणे :- ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ऐतिहासिक परंपरा लाभलेला ‘नारळी पौर्णिमा उत्सव’ आज  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही कळवा खाडी किनारी असंख्य कोळी बांधवांच्या उपस्थितीत पारंपरिक दर्याची पूजा करून ठाणे शहराचा मानाचा नारळ महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी हे ‘दर्याराजा शांत हो.. कोळी-मच्छिमार बांधवांना धंद्यात यश दे ! अशी विनवणी करत मनोभावे दर्याला अर्पण केला.
या  कार्यक्रमास सभागृह नेते नरेश म्हस्के, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, क्रीडा, समाजकल्याण व सांस्कृतिक कार्य. समिती सभापती अमर पाटील, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी,वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष नरेंद्र सुरकर,  कळवा प्रभाग समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, माजिवडा प्रभाग समिती अध्यक्षा पद्मा भगत,   नगरसेविका नंदिनी विचारे, मालती  पाटील,पल्लवी कदम,  राधिका फाटक , प्रियांका पाटील, माजी महापौर स्मिता इंदुलकर, शिवसेवा उप जिल्हा संघटक वंदना डोंगरे, समीद्या मोहिते,  माजी नगरसेवक संजय तरे, गिरीष राजे,  प्रकाश शिंदे, पवन कदम, माजी महापौर प्रमोद राजपूत, विनोद नाखवा,  विजय शिंदे आदी  मान्यवर उपस्थित होते.
ठाणे शहरात ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून इतिहासकालीन नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात येतो. यावर्षीही ‘नारळी पौर्णिमा उत्सव’  2019 चे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान कळवा खाडी येथे जत्रेचे स्वरूप आले असून फुलांनी सजवलेल्या पालखीचे व कुलदैवतांचे मान्यवरांच्या शुभहस्ते पूजन करून ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी कोळी बांधवांचा वैशिष्ट्यपूर्ण पारंपारिक पोशाख बघ्यांसाठी खास आकर्षण ठरले.

तसेच यावेळी मी ‘मुंबईचा हाय कोळी ‘आयोजित पारंपरिक कोळी गीतांच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. समुद्र शांत व्हावा, त्याचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात यासाठी विविध लोककलेचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. नारळी पौर्णिमेच्या या उत्सवात  कोळी बांधवांप्रमाणेच ठाणेकर नागरिकदेखील मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते.