Saturday, January 25 2025 8:28 am
latest

एस. व्ही. एम. पब्लिक स्कूल आणि एन. जे. बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाची कामगिरी

ठाणे, 27 : भोपाळ येथील राष्ट्रीय बालरंग फेस्टिव्हल – २०२३ मध्ये सादर करण्यात आलेल्या पारंपरिक लोकनृत्यात महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती मांडणारे तारपा नृत्य लक्षवेधी ठरले आहे. आसनगाव येथील एस. व्ही. एम. पब्लिक स्कूल आणि एन. जे. बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रसिकांची मने जिंकण्याबरोबरच महाराष्ट्राचा झेंडा बालरंग फेस्टिव्हलमध्ये उंचावला.

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय विभाग आणि मध्य प्रदेश शिक्षण विभाग यांच्या वतीने भोपाळ येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय बालरंग फेस्टिवलमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी आसनगाव येथील विद्यालयाला मिळाली होती. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून आदिवासी संस्कृती व परंपरा मांडली. अनिश शेट्टी, भाविका पाटील, सायली निचिते, जय निचिते, उदय निचिते, अनुष्का घोडे, दुर्गा थापा, प्रफुल पाटील, तेजस्विनी खडके, चेतन पठारे, रुपेश मांगे, सम्यक अडसूळ, संघराज अडसूळ, सुरज डोंभरे, गौरव माळी या विद्यार्थ्यांनी `तारपा’च्या माध्यमातून रसिकांची मने जिंकली. विशेष म्हणजे या स्पर्धेत कोणत्याही प्रकारची सीडी किंवा ऑडिओ म्युझिक वापरण्यास मनाई होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः लाईव्ह संगीत वाजवून नृत्य सादर केले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेचे संचालक अमोल एडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालिका डॉ. नेहा बेलसरे, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर व ललिता दहितुले, शहापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, बालरंग फेस्टिवल महाराष्ट्र टीमचे मार्गदर्शक विक्रम अडसूळ, दीपक बेलवले, ज्योती बेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली आसनगाव येथील एस. व्ही. एम. पब्लिक स्कूल आणि एन. जे. बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाने ही उज्वल कामगिरी केली.

शहापूर तालुक्यातील एस. व्ही. एम. पब्लिक स्कूल आणि एन. जे. बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील मोगरे, शिक्षक अनिल सापळे, सोनाली धामोडे, नीता कमाने, दिलीप थोराड यांनी विद्यार्थ्यांची नृत्यासाठी तयारी करून घेतली होती.