अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास राज्य सरकारला भाग पडणार आ. संजय केळकर..
ठाणे 19 – कळवा येथील एसटीची कार्यशाळा धोकादायक स्थितीत असून कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अपघाताची टांगती तलवार आहे तर दुसरीकडे ४०० लोकांचे काम १०० कर्मचारी करत असल्याने त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी स्लॅब कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले, त्यास अधिकारीच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.
कळवा येथील राज्य परिवहन सेवेच्या कार्यशाळेतील दुरावस्थेबाबत तेथील कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर आमदार संजय केळकर यांनी कार्यशाळेची पाहणी केली. यावेळी इमारतीच्या दुर्दशेबाबत संताप व्यक्त करून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत आणि आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी केलेल्या पाहणीत कार्यशाळा इमारतीचे कॉलम पोखरल्याचे निदर्शनास आले असून त्यातील स्टीलही बाहेर आलेले आहे. भिंती आणि स्लॅब केव्हाही कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते, तसेच शौचालय, स्वच्छतागृहाची अतिशय दयनीय अवस्था असल्याचेही पाहणीत दिसून आले.
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले की येथे मनुष्यबळाची कमतरता असून ४०० कर्मचाऱ्यांची कामे फक्त १०० कर्मचारी करत आहेत. तसेच कमी मनुष्यबळ असताना त्यांच्यावर कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव टाकला जातो. सुटे भाग आणि इतर साहित्यही पुरेसे नाहीत. एकूणच कर्मचारी तणावाखाली असून अपघाताच्या भीतीबरोबरच त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही ढासळू लागले आहे. काम करताना एखाद्याला इजा झाल्यास त्याची नीट काळजी घेतली जात नाही कर्मचाऱ्यांना अपंगत्वाचा दाखला मिळण्यातही अडचणी भेडसावत असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
काही दिवसांपूर्वी इमारतीच्या डागडुजीबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी स्लॅब कोसळून दोन कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे या घटनेस अधिकारीच जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यास आम्ही राज्य सरकारला भाग पाडू, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.
या पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांच्यासह हरी माळी, माजी उपमहापौर अशोक भोईर, श्री. साळवी, लक्ष्मीकांत यादव आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तातडीने दखल घेतल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी श्री. केळकर यांचे आभार मानले.