मुंबई,21: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सर्वाधिक पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. गट ‘ब’ आणि गट ‘क’ संवर्गातील विविध पदांसाठी ८ हजार १६९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात ‘एमपीएससी’ ने शुक्रवारी प्रसिद्ध केली. त्यानुसार ‘गट ‘ब’ आणि गट ‘क’ सेवाभरतीसाठी संयुक्त पूर्व परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार आहे. राज्यातील एकूण ३७ जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल; तर गट ‘ब’ सेवा मुख्य परीक्षा २ सप्टेंबरला, गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा ९ सप्टेंबरला घेण्यात येणार आहे.
पदसंख्या आणि आरक्षणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पदसंख्या आणि आरक्षणात बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल, असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे. तसेच पदभरतीसाठीचे आरक्षण, पात्रता, मार्गदर्शक सूचना आदी तपशील ‘एमपीएससी’ने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे.
अशी होणार ८ हजार १६९ पदांची भरती
• सामान्य प्रशासन विभाग – सहायक कक्ष अधिकारी ७० पदे
• महाराष्ट्र लोकसेवा आयोग- सहायक कक्ष अधिकारी ८ पदे
• वित्त विभाग राज्य कर निरीक्षक – १५९ पदे
• गृह विभाग- पोलीस उपनिरीक्षक- ३७४ पदे
• महसूल व वन विभाग दुय्यम निबंधक (श्रेणी -१)/मुद्राँक
निरीक्षक ४९ पदे
• गृह विभाग- दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – ६ पदे
• वित्त विभाग तांत्रिक सहायक- १ पद
• वित्त विभाग कर सहायक- १४६८ पदे
• मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व राज्यातील विविध कार्यालये – लिपिक टंकलेखक ७०३४ पदे
लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून फक्त एकाच अर्जाद्वारे विविध संवर्गातील या भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. इच्छूक उमेदवारांनी या भरतीप्रक्रियेत सहभागी व्हावे.
महत्त्वाच्या तारखा…
■ अर्ज करण्याची मुदत : २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी
■ ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत : १४ फेब्रुवारी
भारतीय स्टेट बँकेत चलनाची प्रत देण्याची मुदत १६ फेब्रुवारी
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत : १९ फेब्रुवारी
• संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ : ३० एप्रिल
■ गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा : २ सप्टेंबर २०२३
■ गट क संयुक्त मुख्य परीक्षा : ९ सप्टेंबर २०२३