Wednesday, November 6 2024 4:24 pm

एका लुटारुला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर आधी मुख्यमंत्र्य़ांनी राजीनामा द्यावा-नाना पटोले

मुंबई : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रातही निती आयोगासारखीच महाराष्ट्र इंस्टीट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन संस्था म्हणजेच ‘मित्र’ची स्थापन करून त्याच्या उपाध्यक्षपदी अजय आशर नावाच्या बिल्डरची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकारने करून चुकीचा पायंडा पाडला आहे.अजय आशर सारख्या लुटारु व्यक्तीला राज्याच्या तिजोरीवर बसवत असाल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नगर विकास विभागाचे निर्णय घेणारा अजय आशर नावाचा व्यक्ती कोण? असा सवाल विचारला होता. देवेंद्र फडणवीस त्यावेळी विरोधी पक्षनेते होते व त्यांचाही असाच आक्षेप होता. आता त्याच लुटारु व्यक्तीची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकार निती आयोगासारख्या महत्वपूर्ण संस्थेत कॅबिनेट दर्जाच्या उपाध्यक्षपदी कशी करू शकतात? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजय आशर यांच्या नियुक्तीला सहमती आहे का?असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.तसेच कर्नाटकला महाराष्ट्रातील काही गावे देण्याचा घाट घातला जात आहे, उद्योग गुजरातला जात आहेत तसेच राज्याची तिजोरी लुटायचा निर्णय घेतला आहे का ? याचे उत्तर जनतेला दिले पाहिजे.अजय आशर या व्यक्तीबद्दल भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात आक्षेप घेतला होता. मग आता भाजपाचे मनपरिवर्तन झाले आहे का? काल ज्या व्यक्तीवर आक्षेप घेतला त्याच व्यक्तीच्या हाती राज्याची तिजोरी देणे कितपत योग्य आहे? या नियुक्तीमागे भाजपाचाही काही स्वार्थ आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. काँग्रेस पक्षाचा या महत्वाच्या पदावर एका लुटारूची नियुक्ती करण्यास तीव्र विरोध आहे. वेळ पडल्यास हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर आवाजही उठवू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.