नवी दिल्ली, 19 संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा सोमवारी ११ वा दिवस होता. लोकसभेत सलग चौथ्या दिवशी सुरक्षेच्या मुद्द्यावरून गदारोळ झाला. सभापती ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणार्या ३३ खासदारांना निलंबित केले. यामध्ये काँग्रेसचे ११ खासदार, तृणमूल काँग्रेसचे ९, द्रमुकचे ९ आणि इतर पक्षांच्या ४ खासदारांचा समावेश आहे.
यानंतर राज्यसभेतही गदारोळ झाला. त्यामुळे सभापती जगदीप धनखर यांनी ४५ विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी (२२ डिसेंबरपर्यंत) निलंबित केले.
यापूर्वी १४ डिसेंबर रोजी लोकसभेतून १३ खासदारांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसचे ९, माकपाचे २, द्रमुक आणि सीपीआयच्या प्रत्येकी एका खासदाराचा समावेश होता.
याशिवाय राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनाही १४ डिसेंबर रोजी निलंबित करण्यात आले होते. हिवाळी अधिवेशनापासून एकूण ९२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभेतील खासदारांची संख्या २४५ आहे. यामध्ये भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचे १०५, इंडियाचे ६४ आणि इतर ७६ जणांचा समावेश आहे. त्यापैकी ४६ विरोधी खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.
सध्या लोकसभेतील खासदारांची संख्या ५३८ आहे. एनडीएचे ३२९, इंडियाचे १४२ आणि इतर पक्षांचे ६७ खासदार आहेत. त्यापैकी ४६ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज कामकाज सुरू होताच सभागृहात १५ मिनिटांचे भाषण केले. या घटनेवरून राजकारण होणे दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. गोंधळ वाढल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. नंतर ते दुपारी २ वाजेपर्यंत आणि नंतर उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. खासदारांच्या निलंबनानंतर सभागृह मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आले.