Wednesday, October 23 2019 5:17 am

एकही वचन खोटं ठरणारं नाही,असे म्हणत शिवसेनेचा वचननामा जाहीर

मुंबईः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना पक्षाचा वचननामा जाहीर केला. राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा बनवला आहे आणि एकही वचन खोटं ठरणारं नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

१० रुपयांत चांगलं सकस जेवण. तेही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. विशेषत: एका किचनमधून त्याचं वितरण केलं जाईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतलं जाईल, असं शिवसेने वचननाम्यात म्हटलंय. या शिवाय घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलंय. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या आरोग्यचाचण्या एका रुपयात देण्याची ग्वाही वचननाम्यातून देण्यात आली आहे. तसंच अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येक वर्षाला १०००० रुपये जमा करण्याचं वचन शिवसेनेनं दिलंय.