Monday, October 26 2020 3:46 pm

एकविरा गडावर येण्यास भाविकांना बंदी कायम

मुंबई: महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला वेहेरगाव गडावरील आई एकविरा देवीचा नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झालं आहे. घटस्थापनेच्या दिवसापासून महानवमी होमापर्यत सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार विधिवत होणार असल्याची माहिती श्री एकविरा देवस्थान प्रशासकीय समितीचे अध्यक्ष तथा वडगाव कोर्टाचे न्यायाधीश संजय मुळीक यांनी दिली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय आजून कायम असल्याने उत्सव काळात भाविकांना गडावर येण्यास बंदी राहील. नागरिकांनी गडावर येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुळीक यांनी केले आहे.

दरवर्षी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी नवरात्र उत्सवात लाखो भाविक गडावर येत असतात. यावर्षी राज्यात तसेच देशात कोरोना या साथरोगाचे सावट असल्याने भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सर्व मंदिरे मागील सहा ते सात महिन्यांपासून बंद आहेत.

राज्यात सध्या अनलाॅकची प्रक्रिया सुरू असली तरी देवस्थाने व शाळा सुरू करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याने भाविकांना गडावर प्रवेश दिला जाणार नाही तसेच मंदिर हे बंद राहणार आहे. यात्रा काळात देवीचा पहाटेचा अभिषेक, सकाळ व संध्याकाळची आरती, सप्तशृंगी पाठाचे पठन, महानवमी होम हे सर्व धार्मिक कार्यक्रम परंपरागत पद्घतीने फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून केले जाणार आहेत.

यावर्षी नवरात्र उत्सव काळात शासकीय अधिकार्‍य‍ांसह भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थानाला वस्तूं रुपाने मदत करणारे भाविक यांना देखील अभिषेकाला बसण्याची संधी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त कोणालाही गडावर प्रवेश दिला जाणार नाही असे अध्यक्ष संजय मुळीक य‍ांनी सांगितल.