धर्माच्या आड काही देशविघातक कार्ये येथून होऊ शकतात?
ठाणे, 12 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वन विभागाच्या डोंगरावरील एअर फोर्स हद्दीजवळ अनधिकृत मामा-भांजे दरगाहचे अतिक्रमण निष्कासीत करावे अशी मागणी करणारे निवेदन सकल हिंदु समाज या संस्थेच्या वतीने विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपसंचालक – येऊर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली यांना दिले.
यावेळी निवृत्त एअर फोर्स अधिकारी रामकिशोर शर्मा यांच्यासह अनिल म्हात्रे, रजनिश त्रिपाठी, सौरभ कंटे, राकेश सरोज, लक्ष्मीकांत यादव, विवेक जाधव, साई सातुर्डेकर, रितेश पावसकर, अथर्व पस्टे, रमेश चव्हाण, अभिषेक पांडे आदी उपस्थित होते.
अशाचप्रकारचे निवेदन ठाणे महानगरपालिका आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे पोलिस आयुक्त यांना देण्यात आले आहे.
मागील आठवड्यात एनआयए या संस्थेतर्फे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे मारण्यात आले. ठाण्यातही एनआयए च्या टीमने छापे मारले असता राबोडी आणि भिवंडी-पडघा या विभागातून संशयित 19 आतंकवाद्यांची धरपकड करण्यात आली. असे आतंकवादी ठाण्यासारख्या सुसंस्कृत शहरात आढळणे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे, यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आली आहे. असे आतंकवादी अजुन कुठेकुठे लपून असतील सांगता येत नाही. हे आतंकवादी संबधीत अनधिकृत सान्निध्यात लपून रहातात अशी गंभार बाब त्यांनी या निवेदनाद्वारे निदर्शनास आणली आहे
मामा-भाचे डोंगरावर देखील काही लोकांनी अनधिकृत बांधकाम करुन त्याला मजार चे स्वरुप दिले आहे. धर्माच्या आड काही देशविघातक कार्ये येथून होऊ शकतात असा दाट संशय व्यक्त करून एयर फोर्स स्टेशनच्या जवळपास अशा अनधिकृत बांधकामामुळे राष्ट्रीय सुरक्षेस, पर्यावरण आणि वन्यजीवांनाही धोकादायक आहे असे या निवेदनात नमूद करून सदर अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यासाठी एअर फोर्स (येऊर) यांनी वन विभाग व ठाणे जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन विनंती केली आहे. परंतु सदर विभागामार्फत कोणत्याही प्रकारची कारवाई अद्यापही करण्यात आली नाही असे या निवेदनात म्हटले आहे.
देशाच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर असताना सदर विभागाकडून चालढकल होत आहे. सदर अनधिकृत बांधकामावर तातडीने निष्कासीत करण्याची कार्यवाही करण्यात यावी. जर येत्या काळात आपण कारवाई न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल. यातून कायदा-सुव्यवस्था बिघडल्यास याची संपूर्ण जबाबदारी आपली राहील असा इशारा सकल हिंदु समाज या संस्थेच्या वतीने विजय त्रिपाठी यांनी दिला आहे.