कोल्हापूर, 22 : ऊस दराच्या प्रश्नावरून गेले दोन महिने आंदोलन सुरू आहे. सरकारने तातडीने लक्ष घालून दराचा प्रश्न मिटवावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. ऊस दराचा प्रश्न निकाली निघाला नाही तर आम्ही गुरूवारपासून राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत चक्काजाम करू, असेही शिष्टमंडळाने स्पष्ट केले. सरकार हे शेतकर्यांच्याच बाजूने राहणार आहे. कारखानदारांच्या बाजूने आम्ही नाही. सहकार
मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूरच्या दौर्यावर आले असताना विमानतळावर शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.
यावेळी बोलताना स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंधर पाटील म्हणाले की, ऊस दराच्या प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली दोन महिने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहोत. मात्र साखर कारखाने आणि प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. शेतकर्यांचा संयम तुटत चाललेला आहे. राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी गतवर्षीचे एफआरपी अधिक ३०० ते ५०० रूपये दिले आहेत. मग सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांना का जमत नाही. सरकार हे शेतकर्यांच्या बाजूने असेल तर आम्हाला न्याय द्यावा. चुकीची आकडेवारी मांडून प्रशासनाने शेतकर्यांची दिशाभूल चालू केली आहे. हे आम्हाला मान्य नाही.
गुरूवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रीय महामार्गावर बेमुदत चक्का जाम आंदोलन करणार आहे.