Monday, June 17 2019 4:05 am

उस गाळपात उस्मानाबाद अव्वल

उस्मानाबाद – ऊस गळित हंगाम आता जवळपास अंतिम टप्प्यामध्ये आल्याचे दिसून येत आहे. नांदेड विभागात सुमारे ९० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले असून, १०.३८ टक्के इतका उतारा मिळाला आहे. उतारा कमी मिळतो अशी ओरड होत असतानाच मराठवाड्यात साधारण साडेदहा टक्‍क्‍यांपर्यंत उतारा मिळतो, हे या हंगामावरून दिसून येत आहे.
नांदेड विभागामध्ये सध्या ३२ कारखाने सुरू असून, त्यामध्ये १४ सहकारी तर १८ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक दहा, तर लातूर जिल्ह्यामध्ये आठ कारखाने सुरू आहेत.त्याबरोबर या जिल्ह्याचे गाळपही सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. तर लातूर जिल्ह्याचा उतारा १०.८४ टक्के असून, तो विभागात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यातही जिल्ह्यातील दोन कारखाने अकरा व साडेअकरापर्यंत उतारा देणारे ठरले आहेत. नांदेड विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये आता उतारा दहा टक्‍क्‍यांच्या पुढे गेल्याचे चित्र आहे. पहिल्या महिन्यामध्ये उतारा अत्यंत कमी आल्याचे दिसून येत होते. नऊ ते साडेनऊ टक्केच उतारा मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र डिसेंबरपासून उतारा वाढत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. आता मात्र उसाचे क्षेत्र संपत आले असून, मार्चच्या पंधरवड्यात किंवा शेवटपर्यंत उसाचा हंगाम संपण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या वर्षी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना उसाच्या पिकापासून परावृत्त व्हावे लागले होते, त्याचा परिणाम कारखाने बंद पडले होते; पण यंदा या उद्योगाने पुन्हा उभारी घेतल्याचे चित्र आहे. मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांमध्ये ९० लाख मेट्रिक टनाचे गाळप आताच झाले आहे. अजूनही यामध्ये वाढ होणार असल्याने हंगामाचे समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. दोन महिन्यांमध्ये साखरेचे भाव घसरल्याने अडचणीचा सामना उद्योगाला करावा लागला असला, तरी आता पुन्हा दर वाढण्यास सुरुवात झाल्याने तेही संकट दूर होईल, अशी अपेक्षा उद्योगातील जाणकार व्यक्त करीत आहेत.