मुंबई, 4 : पावसाअभावी राज्याच्या काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता मागणीप्रमाणे टॅंकर सुरु करण्याच्या सूचना देण्यात येतील. तसेच उपसा सिंचन योजनेच्या वीज बिलात यापूर्वी देण्यात आलेली सवलत यापुढेही सुरु ठेवण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, अशी माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली.
सदस्य अनिल बाबर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री . विखे पाटील यांनी उत्तर दिले.
ते म्हणाले की, राज्याच्या दुष्काळी भागात पाणीटंचाईच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. यातील बराचसा भाग उपसा सिंचन योजनांवर अवलंबून आहे. राज्य शासन पूर्वलक्षी प्रभावाने अतिउच्च दाब, उच्चदाब आणि लघुदाब उपसा जलसिंचन योजनांना सवलत लागू केली आहे. ही सवलत तशीच पुढे लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत सकारात्मक कार्यवाही शासन स्तरावर होईल, अशी माहिती मंत्री श्री. विखे –पाटील यांनी दिली.
सध्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 13 गावांसाठी 15 टॅंकरद्वारे आणि आटपाडी तालुक्यातील 3 गावांसाठी 3 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा कऱण्यात येत आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील 39 गावे आणि 263 वाड्यांना 41 टॅंकरद्वारे आणि खटाव तालुक्यातील 2 गावांना एका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापूर तालुक्यातील मंगळवेढा तालुक्यामध्ये नळपाणीपुरवठा योजना, हातपंप आणि खासगी उद्भवनाद्वारे पाणीपुरवठा सुरु असून सांगोला तालुक्यात एका गावास टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिली.
यावेळी सदस्य सर्वश्री जयंत पाटील, विश्वजीत कदम, जयकुमार गोरे, विक्रमसिंह सावंत, शहाजीबापू पाटील, राहुल कुल आणि दीपक चव्हाण यांनी सहभाग घेतला.