*घाटंजी येथील रसिकाश्रय*
*संस्थेने घडविली मुंबईची सफर*
मुंबई 24:- साहेब, मुंबईचा समुद्र बघितला..
उंच इमारती, हाॅटेल बघितली… झगमगाट बघितला… आनंद वाटला. पण सगळ्यांत जास्त समाधान वाटले ते तुम्हाला भेटून… हे उत्स्फूर्त शब्द आहेत घाटंजी येथील वृद्ध कष्टकऱ्यांचे.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील वृद्ध कष्टकरी महिला आणि पुरुषांनी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. घाटंजी येथील रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून वृद्ध कष्टकरी महिला आणि पुरुषांना मुंबईची सफर घडविण्यात आली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सर्व वृद्ध कष्टकऱ्यांशी आत्मीयतेने संवाद साधला. व त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे वृद्ध
कष्टकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
वृद्ध कष्टकऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कष्टकरी आणि वृद्धांना मुंबईची सफर घडवून त्यांच्या जीवनात हास्य फुलविण्याचा रसिकाश्रय संस्थेचा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना ‘एसटी’च्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ अनेक ज्येष्ठ नागरिक घेत आहेत. वृद्ध, निराधार आणि कष्टकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून दिलासा देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी मुख्य आयोजक महेश पवार, देवेंद्र गणवीर, वर्षा विद्या विलास, संतोष गरजे हे उपस्थित होते. निर्मला राठोड, शोभा राव, वामन चौधरी, इंदूबाई पोटपिल्लेवर, विष्णू शिंदे या वृद्ध कष्टकऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधला.
*जीवाची मुंबई-*
*गरीब वृध्द कष्टक-यांची सहल*
ज्यांची मुले सक्षम आहेत, त्या वृद्धांनाही अनेकदा कुणी तीर्थ यात्रेला नेत नाहीत. स्वत:च्या चकचकीत आयुष्यात अनेक तरुणांना जन्मदातेही नकोसे होतात. मग ज्या वयोवृद्धांना कुणीच नाही, त्यांच्या आनंदाचा कोण विचार करेल?
या जाणीवेतून कष्टकरी वृद्धांच्या सहलीचा उपक्रम घेण्यात आल्याचे रसिकाश्रय संस्थेचे महेश पवार यांनी सांगितले.
महेश पवार म्हणाले,
मुळात आम्ही त्यांना म्हातारे म्हणतच नाही.
ते ज्येष्ठ आहेत. जीवनाचा अनुभव गाठीशी बांधलेले ते पितामह आहेत. खस्ता खात जीवनाची सत्तर ऐंशी वर्ष त्यांनी दोन घासांची जुळवाजुळव करता-करताच एकेक श्वास खर्च केलेला असतो. वृद्ध कष्टकऱ्यांच्या आयुष्याची ‘सेकंड इनिंग’ गोड करण्याचा मानस यामागे आहे. या उपक्रमात २० निराधार वयोवृद्धांना मुंबईची सफर घडविण्यात आली.
नातवांना ‘झुकझुक गाडी’चे गाणे शिकविणारे हे ज्येष्ठ रेल्वेने मुंबईत आले. सर्वजण समुद्र किनाऱ्यावर आनंदात मुक्तपणे फिरले.
अभिनेते सयाजी शिंदे यांनी मोबाईलवर व्हिडिओ कॉल करून या कष्टकरी वृद्धासोबत संवाद साधला.
आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने, त्यांच्याशी संवाद साधून या सगळ्यांना विशेष समाधान मिळाल्याचे श्री पवार यांनी सांगितले.