मुंबई, 1 : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आणि संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कारांचे वितरण 2 फेब्रुवारीला संध्याकाळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभादेवी येथील पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे संध्याकाळी 6.00 वा. होणार आहे. या कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार सदा सरवणकर, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित राहणार आहेत.
सन 2020 रोजीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार डॉ. एन. राजम यांना तर सन 2021 रोजीचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पं. शिवकुमार शर्मा यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सन 2019-20 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला होता. सन 2020-21 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार दत्ता भगत यांना तर, सन 2021-22 सालाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
सन 2019-20 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार मधुवंती दांडेकर यांना,सन 2020-21 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार दीप्ती भोगले यांना तर सन 2021-22 सालाचा संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार सुधीर ठाकूर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
याशिवाय संगीत नाटक अकादमी पुरस्कारप्राप्त कलाकारांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार आहे.सन 2019 साठी दिग्दर्शनासाठी कुमार सोहोनी, लोकसंगीतासाठी पांडुरंग घोटकर, वाद्य निर्माणासाठी माजिद गुलाबसाहेब सतारमेकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सन 2020 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी वि. आरती अंकलीकर-टिकेकर, अभिनयासाठी प्रशांत दामले, कळसूत्री बाहुल्यांसाठी मीना नाईक, समग्र योगदान- कथकसाठी डॉ. नंदकिशोर कपोते, ओडिसी नृत्यासाठी पं.रवींद्र अतिबुद्धी, सुगम संगीतासाठी अनुप जलोटा आणि कॉन्टेम्पररी नृत्यासाठी . भूषण लकींद्रा यांचा सत्कार करण्यात येणार आहे.सन 2021 साठी हिंदुस्थानी शास्त्रीय गायन-धृपदसाठी पं.उदय भवाळकर, कथक नृत्यासाठी शमा भाटे, व्हायोलिनसाठी डॉ. संगीता शंकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
याशिवाय लोककलेसाठी डॉ. प्रभाकर भानुदास मांडे, सतारसाठी पं. शंकर कृष्णाजी अभ्यंकर, कथ्थकसाठी डॉ. पद्मा शर्मा, संगीतासाठी उस्ताद उस्मान अब्दुल करीम खान, तारपा लोकसंगीतासाठी भिकल्या लडक्या धिंडा आणि तमाशा लोकनाट्यासाठी डॉ. हरिश्चंद्र प्रभाकर बोरकर या अमृत पुरस्कारप्राप्त मान्यवरांचाही सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजनही करण्यात आले आहे. गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी बेगम परवीन सुलताना आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे गायन होणार आहे. शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी वि. आरती अंकलीकर, वि. सानिया पाटणकर, विराज जोशी यांचे गायन होणार आहे. तर पं. उद्धव आपेगांवकर आणि पं. पुष्कराज कोष्टी यांचे वादन होणार आहे. शनिवारी 4 फेब्रुवारी रोजी पं. राजा काळे, डॉ. आशिष रानडे आणि पं. कैवल्यकुमार गुरव यांचे गायन तर वि.कला रामनाथ यांचे वादन होणार आहे.