ठाणे,15 : उद्याचा ठाणेकर शहराबद्दल कसा विचार करतो हे जाणून घेण्यासाठी ठाणेवैभव आयोजित आणि वाविकर आय इन्स्टिटयूट प्रायोजित ‘व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उदघाटन शनिवार १६ डिसेंबर २०२३ रोजी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते होत आहे.
इटरनिटी गृहप्रकल्प आणि ज्ञानसाधना महाविद्यालयादरम्यान सेवा रस्त्यावर असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारक मंदिरात दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमात १३० शाळांतील दोन हजारांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेली चित्रे आणि सुमारे ८० मॉडेल्स (प्रतिकृती) यांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे विद्यार्थ्यांशी हितगुज करून त्यांच्या अपेक्षा आणि सूचना समजून घेणार आहेत.
या व्यतिरिक्त शहर विकास, पर्यावरण, वाहतूक, कायदा, सुव्यवस्था, नियोजन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ येणार आहेत.
या उपक्रमास पाठिंबा द्यावा असे आवाहन वाविकर आय इन्स्टिटयूटचे डॉ. चंद्रशेखर वाविकर आणि ठाणेवैभवचे संपादक मिलिन्द बल्लाळ तसेच व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी केले आहे.