ठाणे १४ : ‘हे वय अभ्यासाचे आहे आणि खेळायचेही आहे. यातून शरीर आणि बुद्धी तंदुरुस्त राहीलच पण मन निरोगी ठेवण्यासाठी चांगले संस्कार आत्मसात करा आणि सुसंगती ठेवा, असा कानमंत्र आमदार संजय केळकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
दिव्यात शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या कुचंबणेला आमदार संजय केळकर यांनी नुकतीच वाचा फोडली होती. दुसरीकडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा उत्साहात पार पडल्या आहेत. त्यानंतर श्री.केळकर यांनी शहरातील १२ शाळांना भेटी देत विद्यार्थ्यांशी हितगुज साधत त्यांना यशाचा कानमंत्र दिला.
आजचे विद्यार्थी हे उद्याचे सुजाण नागरिक आहेत. पुढील काळात त्यांच्या खांद्यावर देशाच्या कारभाराची जबाबदारी पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मन, बुद्धी आणि शरीर निरोगी ठेवण्याकडे लक्ष द्यायला हवे. अभ्यासबरोबरच खेळालाही महत्व द्यायला हवे, त्यातून शरीर आणि बुद्धीचा सकारात्मक विकास होणार आहे. तर मन निरोगी ठेवण्यासाठी चांगले संस्कार आत्मसात करा. आई-वडील आणि गुरुजनांचा आदर करा, चांगले मित्र जोडा, असा सल्ला श्री.केळकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
मोबाईलचा अतिवापर टाळा, लेखन-वाचन यावर अधिक भर द्या. पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानाचीही कास धरा. चांगल्या मित्रांची संगत ठेवा, वेळेचा अपव्यय करू नका. आपले लक्ष्य केंद्रित करूनच वाटचाल करा, असा सल्लाही आमदार संजय केळकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी श्री.केळकर यांनी शिक्षकांच्याही भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. केळकर कुटुंबियांच्या तीन पिढ्या शिक्षण क्षेत्रात असून विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्यांना प्राथमिक शिक्षक परिषदेच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून देत आहेत. शाळांना भेटी देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी सुसंवाद साधण्याच्या त्यांच्या या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.