Monday, June 1 2020 1:18 pm

उदरनिर्वाहाच्या अधिकारासाठी आजीबाई बसल्या उपोषणाला

ठाणे -: पाच पिढ्यांपासून कसत असलेली गुरचरण जमीन अचानक भूमिअभिलेखा विभागाने म्हाडाकडे हस्तांतरीत केली आहे. त्यामुळे आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप करीत वयाची 80 वषे गाठलेल्या दोन आजीबाईंनी आपल्या गावकर्‍यांसह ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. सुमारे 80 वर्षे वयाच्या आजीबाई म्हणजेच निराबाई जगन पोरजी, सुंदराबाई गोवर्धन पाटील यांनी केलेले उपोषण हा ठाणे शहरात चांगलाच चर्चेचा विषय झाला होता.
गेल्या चार ते पाच पिढ्यांपासून या भागातील गावकरी गायरान जमिनी कसत आहेत. तरीही, जिल्हाधिकारी कार्यालय, भूमिअभिलेखा यांनी चुकीच्या पद्धतीने हद्दनिश्चिती करुन गावकरी कसत असलेल्या जमिनी म्हाडाकडे वर्ग केल्या आहेत. या संदर्भात भूमिहीन शेतकर्‍यांनी, राज्यपालांसह मुख्यमंत्री, जिल्हाधिकार्‍यांकडे अनेकवेळा अर्ज केले आहेत. आपल्या विभागाकडून धुळे येथे सन 2017 मध्ये कसेल त्याची जमिन या नियमाचा आधार घेत अनेक गायरान जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावे केल्या आहेत. तसेच, सन 2013 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने याबाबत तसा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची प्रखरपणे अंमलबजावणी करण्यात आलेली नव्हती. या संदर्भात मराठवाड्यातील काही गायरान भू धारक शेतकर्‍यांनी राज्यपालांकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे 17 एप्रिल 2017 रोजी राज्यपाल महामहिम विद्यासागर राव यांनी क्र. आरबी/टीसीई/ई/ 3015 (3) 2015 एमएमआरसी -22ए/ 532 या अद्यादेशाद्वारे गायरान तथा गुरचरण जमीनी कसणार्‍यांच्या नावे करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ( दुसरी सुधारणा) अधिनियम 2017 ; 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 41 च्या कलम 22 अ चा आधार घेतला आहे. मात्र, हा अद्यादेश भंडार्ली गावात लागू न करता कसणार्‍या जमिनी हिसकावून घेतल्या आहेत, असा आरोप करुन निराबाई जगन पोरजी, सुंदराबाई गोवर्धन पाटील या दोन वयोवृद्ध महिलांनी वनिता आत्माराम पाटील , निवृत्ती गोवर्धन पाटील, काशीराम गंगाराम वाघे ,वसंत नामा पाटील, भरती नामदेव पाटील, शाळूबाई काशिनाथ वाघे , सीताबाई वसंत पाटील यांच्यासह भारिपचे नेते राजाभाऊ चव्हाण, सुरेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय उपोषण केले.
यावेळी, उपोषणकर्त्यांनी कसणार्‍याला जमीन देण्यासंदर्भात तत्कालीन पंतप्रधान दि. इंदिरा गांधी यांनी केलेल्या कायद्याची अमलबजावणी करावी; मराठवाड्यात भूमिहीन शेतकरी कसत असलेल्या जमिनी त्यांच्या नावे करण्याचा निर्णय रे 17 एप्रिल 2017 रोजी राज्यपाल महामहिम विद्यासागर राव यांनी क्र. आरबी/टीसीई/ई/ 3015 (3) 2015 एमएमआरसी -22ए/ 532 या अद्यादेशाद्वारे घेतला आहे. या निर्णयाची अमलबजावणी भंडार्ली गावातही करण्यात यावी ; शेतजमिनी (गायरान/ गुरचरण ) म्हाडासारख्या कोणत्याही संस्थेकडे देण्यात याव्यात; असा प्रयोग कुठेही झालेला नसताना याच गावात असा प्रयोग करून खासगी इसमांचे हित साधणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी ; बीड , अहमदनगर आदी जिल्ह्यांमध्ये भूमी अभिलेख खात्याने गायरान जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावे केल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये भंडार्ली गावात सदर खात्याने ह्या जमिनी म्हाडा कडे वर्ग करून राज्यपालांच्या अध्यादेशाचा अवमान केला आहे. या प्रकरणी संबधींत अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी; भंडार्ली गावात गेले पाच पिढ्यांपासून गायरान जमिनी कसून आपली उपजीविका केली जात आहे. आता आम्हा शेतकर्‍यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होत असल्याने सदर जमिनी वर्ग करण्याचा निर्णय रद्द करून आमच्या नवे करण्यात याव्यात; जर या जमिनी म्हाडाकडे वर्ग करण्यात आल्या असतील तर येथे येथे खासगी सुरक्षा रक्षक नेमून शेतकरी , महिला यांच्यावर दडपशाही करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी , आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. तर, आठ दिवसात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला. तर, गायरान जमिनी नावावर न केल्यास मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राजाभाऊ चव्हाण यांनी यावेळी दिला.