मुंबई, ३ चंद्रपूर शहरातून वाहणाऱ्या इरई नदीच्या स्वच्छतेसाठी नदीतील गाळ व झुडपे पावसाळ्यापूर्वी काढण्यात येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील इरई नदीचे पुनरूज्जीवन आणि खोलीकरणाबाबत सदस्य अभिजित वंजारी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नास उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यापूर्वी २०१६ ते २०१८ मध्ये शहरास समांतर वाहणाऱ्या इरई नदीतील ७ किमी अंतरामध्ये ६०० स.घ.मी. गाळ व झुडपे काढून स्वच्छता करण्यात आली आहे. अधिकचा गाळ काढण्याचे काम पावसाळ्यापूर्वी गतीने करण्यात येईल. तसेच, यापूर्वी झालेल्या कामांमध्ये अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड च्या माध्यमातून निधी वापरण्यात येईल. कामाचा दर्जा व गुणवत्ता तपासणी केल्यानंतरच देयके अदा करण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सुधाकर आडबाले, भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले.
०००
श्रद्धा मेश्राम/ससं/
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत संपूर्ण कालव्याची कामे २०२४ पर्यंत
पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गोसीखुर्द प्रकल्पात पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आवश्यक निधीची तरतूद करुन कालबद्ध पद्धतीने कालवे व वितरण प्रणालीची कामे २०२४ पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी कालव्याच्या कामांसंदर्भात सदस्य रामदास आंबटकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, घोडाझरी कालव्यांसंदर्भात नलिका वितरण प्रणालीचा (पीडीएन) तसेच ठिबक सिंचनाचा वापर करण्यात येईल. यापूर्वीच्या सर्व निविदा रद्द करण्यात आल्या असून फेरनिविदा काढण्यात येणार आहे. तसेच कोरोनामुळे काम बंद होते. भूसंपादन, मोबदला यांसह अन्य कारणाने विलंब झाला होता. तथापि यापुढे गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत कालवे व वितरण प्रणालीची कामे पुरेसा निधी देवून प्राधान्याने हाताळण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.