Saturday, August 24 2019 11:34 pm

इगल कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करावा,आनंद परांजपे यांची मागणी

ठाणे :- इगल कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली आहे. इगल कन्स्ट्रक्शनने नवीन ड्रेनेज लाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात सचिन काकोडकर यांचा मृत्यू झाला आहे.. सुरक्षेची कोणतीच यंत्रणा न वापरता हे खोदकाम करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
सचिन काकोडकर हे त्यांची मारूती सुझुकी अर्टीका गाडी निलकंठ ग्रीन्सकडून घोडबंदर रोडकडे सकाळी घेऊन जात होते. त्याचवेळी मुल्ला बाग बस डेपोजवळ ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात त्यांची गाडी पलटी झाली. अशा प्रकारे खोदकाम सुरू असलेल्या  ठिकाणी बॅरीकेट्स उभारणे सक्तीचे केले आहे.  तरीही संबधित ठेकेदाराने ते उभारले नाहीत.  निविदामधील अटीशर्तीनुसार सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांकडे ठेकेदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.  तसेच उत्खननातून निघालेली माती रस्त्यावर इतस्ततः पसरली असतानाही त्याची विल्हेवाट (बॅक फिलींग) लावण्यात आली नाही.  त्यामुळेच काकोडकर यांची कार मातीवरून घसरून खड्ड्यात पडली. या अपघाताला सदर ठेकेदार तसेच या कामकाजावर देखरेख ठेवणारे पालिकेचे  अधिकारीदेखील जबाबदार आहेत.  त्यामुळे ठेकेदारासह संबधित अधिकार्यांवर  सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करावा, मृत काकोडकर यांच्या कुटुंबियांना अर्थसाह्य करावे , अशी मागणी परांजपे आणि मुल्ला यांनी केली आहे.