Tuesday, July 7 2020 12:55 am

इक्बाल मिर्चीचा साथीदार हुमायूं मर्चंट अटकेत

मुंबई :-  एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम साठी काम करणाऱ्या ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याचा खास मित्र असलेला हुमायूं मर्चंट याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (मंगळवार) अटक केली.   राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्‍ल पटेल आणि इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिरची यांच्यात असलेल्या कथित आर्थिक भागीदारीसंदर्भात ईडीने नुकतीच चौकशी केली आहे.  इक्बाल मिर्चीच्या कुटुंबाने दुबईत ९ मिलियन दिरहममध्ये फाइव्ह स्टार हॉटेलच्या खरेदी व्यवहारात मर्चंटचा सहभाग होता. दक्षिण मुंबईतील इमारती रियल इस्टेट विकासकांना विकण्याच्या व्यवहारात मर्चंटचा मोठा सहभाग असल्याचे बोलले जात आहे.

मिर्चीची पत्नी हजरा आणि डी कंपनीशी देखील मर्चंट याचे जवळचे संबंध आहेत. तो व्यवहार करण्यासाठी मुंबईतून लंडनला देखील जात असे. तो वरळीतील तीन मालमत्ता २२० कोटी रुपयांना खरेदी करणारी सनब्लिंक या कंपनीशी देखील जोडलेला होता. या व्यवहारातून मिर्चीला एकूण १७० कोटी रुपये मिळाले होते. अखेर सनब्लिंक रियल इस्टेटवर ईडीची नजर पडलीच. कारण या कंपनीने डीएचएफएलकडून मोठे कर्ज घेतले होते. डीएचएफएलच्या कार्यालयांमध्ये शनिवारी छापाही मारण्यात आला होता.