Friday, May 24 2019 8:21 am

इंधन भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नागपूर – शासकीय कंपनीच्या पेट्रोल टॅंकरमधून पेट्रोल व डिझेलची चोरी केल्यानंतर त्यात भेसळ करून विक्री करणाऱ्या अड्ड्यावर शनिवारी पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने छापा घातला. छाप्यात दोन रिकामे टॅंकर व सहा इंधन भरलेले टॅंकर जप्त केले. तसेच ९ आरोपींना अटक केली.
पोलिस उपायुक्त नीलेश भरणे यांच्या पथकाने रिंग रोडवरील फोर लेन धाबा, तिरोडी रोड अतिक ठाकूर गोडाउन, वाठोडा येथील पटेल ट्रेडिंग कंपनीवर सापळा रचून धाडी टाकल्या. पोलिसांना येथे पेट्रोल, डिझेल व रॉकेलचे जवळपास २० बॅरल आढळले. तसेच ५ खाली टॅंकर व ६ इंधन भरलेले टॅंकर जप्त केले.तत्पूर्वी आरोपींना परवानासह उद्देशाचे कारण विचारले असता पोलिसांना याबाबतचे कागदपत्र सादर करण्यास अपयशी ठरले. ज्वलनशील पदार्थाचा अवैध साठा करून ठेवणे, त्यात भेसळ करून विक्री करणे, भेसळीमुळे पर्यावरणाला धोका निर्माण करणे, तसेच ज्वलनशील पदार्थाचा साठा करून नागरिकांना धोका निर्माण होईल, असे कृत्य करणे आदी कारणांसाठी ९ जणांविरुद्ध कारवाई केली.
आरोपी हे रस्त्याने जाणाऱ्या शासकीय इंधन वाहून नेणाऱ्या टॅंकरचालकांशी संगणमत करून इंधनाची चोरी करायचे. नंदनवन पोलिसांनी आरोपींविरुद्ध इंधन चोरीचा गुन्हा दाखल केला. भेसळ संबंधाने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी नमुने तपासणीसाठी घेतले. त्यांच्या अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यत येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले