Wednesday, August 12 2020 8:22 am

आ. संजय केळकर यांच्या प्रयत्नातून कोर्ट नाका येथील अशोक स्तंभ खुला..

ठाणे :-  भावी पिढीला ठाणे शहराचा ऐतिहासिक वारसा माहिती व्हावा यासाठी स्वातंत्र्यलढ्यात ठाणेकरांच्या योगदानाचे प्रतिक असलेला अशोक स्तंभ हा आमदार संजय केळकर यांच्या अथक प्रयत्नातून, संकल्पनेतून तसेच महापालिकेच्या सहकार्याने व परवानगीने कोर्ट नाका येथे उभारण्यात आला आहे. तो अनंत चतुर्थीच्या मुहूर्ताला ठाणेकरांच्या आग्रहाखातर खुला करण्यात आला असून यामुळे कोर्ट नाक्याला पुन्हा अशोक स्तंभ चौक म्हणून ओळख मिळाली असल्याची भावना ठाणेकरांनी व्यक्त करून आ. केळकर यांचे आभार मानले आहेत. जुने ठाणेकर अनेकदा या स्मारकाच्या स्मृती जागवत असत.

स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाचे प्रतिक म्हणून कोर्ट नाका येथे १९५२ साली स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हाणे यांच्या पुढाकाराने व उपस्थितीत अशोक स्मृती स्तंभ उभारण्यात आला होता. ठाण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष तारापोरवाला यांनी या अशोकस्तंभ उभारणीला परवानगी दिली होती. तत्कालनी मंत्री डॉ. हिरे यांच्या हस्ते या प्रतिकाचे उद्घाटनही करण्यात आले होते. मात्र १९८३ मध्ये  कळव्याच्या दिशेने येणार्‍या एका ट्रक च्या धडकेत हा स्तंभ उध्दवस्त झाला होता. स्वातंत्र्याची ही स्मृती चिरंतन रहावी यासाठी ठाणेकरांच्या भावना लक्षात घेऊन आमदार संजय केळकर यांनी यासाठी ठाणे महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. आ. केळकर यांच्या आमदार निधीतून व महापालीकेच्या निधीतून हा स्तंभ उभारण्यात आला. आ. केळकर यांच्या संकल्पने प्रमाणे या स्तंभात देशाचा तिरंगा झेंडा हातात घेवून जाणारे जवान व भारतीय संविधानाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. हा स्तंभ सुमारे ३५ फूट उंचीचा असून यात ३ शिल्पांचा समावेश आहे. त्याचबरोबर घटनेच्या उद्दिष्ट असलेल्या कोनशीलेचाही यात समावेश आहे. एफ. आर. पी. तंत्रज्ञानात हे शिल्प साकारण्यात आली आहेत.

ज्या नीळकंठ खानविलकर यांनी विधान भवनातील अशोक स्तंभ १९८० मध्ये साकारले, त्यांचाच मुलगा श्रेयस खानविलकर यांनी हा अशोकस्तंभ साकारला  आहे.

ठाणे शहर एकीकडे स्मार्ट सिटी होत असताना भावी पिढीला आपला ऐतिहासिक वारसा कळावा, यासाठी या अशोक स्तंभाची आणि स्मारकांच्या उभारणीची गरज होती, यासाठी मी या स्मारकाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केला. स्वातंत्र्यलढ्यातील आठवणींचे प्रतिक असलेले हे स्मारक उभे रहावे, अशी अनेक ठाणेकरांची इच्छा होती. या इच्छेला मूर्त रूप देण्यात मला यश आल्याची भावना आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली.