महापालिका कर्मचाऱ्यांना २१५०० रुपयांचे सानुग्रह अनुदान; कर्मचाऱ्यांनी मानले आभार
ठाणे 7 : मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे, आशा सेविकांना ६००० रुपये भाऊबीज म्हणून देण्यात येणार आहेत. तर, ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २१५०० रुपये एवढे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहेत. भाऊबीज आणि सानुग्रह अनुदानात भरघोस २० टक्क्यांची वाढ करण्यात आल्याने आशा सेविका आणि ठामपा कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.
आशा सेविकांना गेल्यावर्षी प्रथमच ५००० रुपयांची भाऊबीज मा. मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार देण्यात आली होती. यंदा त्यात २० टक्क्यांची भरघोस वाढ करण्यात आली आहे.
तसेच, ठाणे महानगरपालिकेने सन २०२१-२२साठी १८ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले होते. त्यातही ३५०० रुपयांची म्हणजेच २० टक्क्यांची भरघोस वाढ करून सन २०२२-२३साठी २१५०० रुपये देण्याचे आदेश मा. मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार, धनत्रयोदशीच्या आधी ही भाऊबीज आणि सानुग्रह अनुदान संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
सोमवारी झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत सानुग्रह अनुदानाबद्दल चर्चा झाली. मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्यासह या बैठकीत माजी महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.
ठाणे महापालिकेचे ६२८२ कर्मचारी, शिक्षण विभागाचे ६९७ कर्मचारी, परिवहन विभागाचे १५०० कायम कर्मचारी, महापालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी व इतर असे ३७२ कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागात रस्ते सफाईसाठी असलेल्या कंत्राटी कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण संबंधित कंत्राटदारामार्फत करण्यात येईल. या निर्णयामुळे, ठाणे महापालिकेस सानुग्रह अनुदानापोटी सुमारे २० ते २२ कोटी इतका अतिरिक्त भार येणार आहे. सानुग्रह अनुदानाची घोषणेमुळे ठामपा कर्मचारी आनंदी असून त्यांनी मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.