मुंबई, 4: महाराष्ट्र शासनाच्या वतीने 8 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारा “ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार” सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. वर्ष 19-20,20-21,21-22 व 22-23 या वर्षाचे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्याचा कार्यक्रम आळंदी येथे प्रस्तावित करण्यात आला होता.
पुरस्कार प्राप्त सन्माननीय बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन झाल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाहीत तर श्री बद्रीनाथ तनपुरे महाराज हे प्रकृती अस्वस्थपणामुळे व बाबा महाराज सातारकर यांच्यावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराचा विचार करून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी कळवले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून या अपरिहार्य कारणामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.