*३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी*
*हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ योजनेच्या विस्ताराची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा*
*राज्यात ५०० ठिकाणी सुरू होणार ‘आपला दवाखाना’*
मुंबई, ९: राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेच्या विस्ताराची घोषणा देखील केली. राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी हे सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज येथे सांगितले.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध आरोग्य शिबिरांचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ.विजय कंदेवाड यांच्यासह राज्यभरातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आपल्या सरकारची वाटचाल सुरू आहे. सामान्यांच्या जीवनाशी निगडीत असे आरोग्यविषयक विविध उपक्रम आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांच्या पुढाकारातून राज्यभर हाती घेण्यात आली आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असेल असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
आजच्या दिवसाचं औचित्य साधत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे “आपला दवाखाना” या योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. मुंबईपाठोपाठ आता राज्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयी आपला दवाखाना सुरू होणार असून सुमारे ५०० ठिकाणी आपला दवाखान्याचा शुभारंभ होणार आहे ही आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयं, उपजिल्हा रुग्णालयं, ग्रामीण रुग्णालयं, स्त्री रुग्णालयं, नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत “आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. या आरोग्य शिबिरांत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी होईलच, सोबतच त्यांना आवश्यक ते उपचार देखील मिळतील. याचाही लाभ राज्यभरातील जनतेला होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मी स्वतः अनेकदा रक्तदान करीत असतो, हे सांगत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, रक्त ही निसर्गानं आपल्याला दिलेली मौल्यवान देणगी असून, त्यांच निरपेक्ष भावनेनं दान करण्यासारखं पुण्यकर्म नाही. हीच बाब लक्षात घेऊन आज राज्यात सुमारे ३६६ ठिकाणी “महारक्तदान शिबिरांचंही आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरांत सहभागी होऊन रक्तदान करा, व एखाद्या गरजूला जीवनदान द्या, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र नेहमीच रक्तसंकलनात देशात अग्रेसर असतो. तो यापुढेही राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करताना त्यांचे आभारही मानले. संकलित रक्त कुठेही वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.
राज्यात जागरुक पालक सुदृढ बालक मोहीमही हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सुमारे १८०० शाळांमधील १८ वर्षांखालील विद्यार्थ्यांची आरोग्यतपासणी या अंतर्गत होणार आहे.
राज्यातील सगळ्या घटकांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी हे सारे उपक्रम, मोहिमा आपण हाती घेतल्या आहेत. आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे त्यासाठी कौतुकास पात्र आहेत. यापुढेही सामान्य माणसाची आरोग्यसेवा अशाप्रकारे होत राहील आणि आपला महाराष्ट्र समृद्ध आणि निरोगी राहील, अशा सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केल्या.