Monday, June 16 2025 8:55 pm

‘आरटीई’ प्रतीक्षा यादी – टप्पा क्र. ०३ साठी प्रवेश प्रक्रियेच्या मुदतीत वाढ

पालकांना अंतिम संधी; १४ मे २०२५ पर्यंत पूर्ण करा प्रवेश

ठाणे 09 – शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता आरटीई २५% (Right to Education) अंतर्गत प्रवेश प्रक्रियेतील प्रतीक्षा यादी टप्पा क्र. ०३ साठी विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीची अंतिम मुदत पूर्वी ०७ मे, २०२५ पर्यंत देण्यात आलेली होती. मात्र, अनेक पालकांकडून अद्याप प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे, या टप्प्यातील प्रवेशासाठी आता मुदतवाढ देऊन अंतिम तारीख १४ मे, २०२५ करण्यात आली आहे.

या टप्प्यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह आणि अलॉटमेंट लेटरसह नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन, विहित मुदतीपूर्वी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, यानंतर या टप्प्यात प्रवेश प्रक्रिया करण्याची संधी मिळणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी.

या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, “शासनाच्या सर्वसमावेशक शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पालकांनी वेळेत प्रतिसाद देणे गरजेचे आहे. पात्र विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची संधी वाया जाऊ नये, यासाठी मुदतवाढ दिली आहे.”
तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी स्पष्ट केले की, “प्रवेश प्रक्रियेसाठी १४ मे ही अंतिम तारीख असून, या नंतरची कोणतीही विनंती ग्राह्य धरली जाणार नाही. पालकांनी योग्य ती काळजी घेऊन प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी.”