Tuesday, November 19 2019 3:51 am
ताजी बातमी

आयुक्तांचे आदेश मिळताच खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळी वर सुरु

ठाणे :-  जून महिन्याच्या अखेर पासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले असल्याने या खड्ड्यातून नागरिकांना वाहन चालवताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा खड्ड्यामुळे अपघात झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे  आता हे खड्डे बुजवण्याची व्यापक मोहीम ठाणे महापालिकेच्या वतीने राबवण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील रस्त्यावरील खड्डे ३ दिवसांच्या आत भरण्यात यावे असे आदेश बांधकाम विभागाला दिल्यानंतर शुक्रवार दि १२ जुलै पासून ठाण्यातील ९ प्रभातसमितीने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळी वर सुरु आहे.   या मोहिमे अंतर्गत गेल्या दोन दिवसांत ३६२ खड्डे  बुजवण्यात आले  असल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे . येत्या सोमवार पर्यंत ही मोहीम सुरु राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे .

गेल्या काही दिवसांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून यामुळे शहरात अनेक ठिकाणी खड्डेपडले आहेत . मुख्य रस्ते तसेच हायवेच्या ठिकाणी देखील  हे खड्डे पडले असून यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे . अनेक वाहनचालकांना या खड्ड्यातून आपली गाडी चालवावी लागत असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे . या सर्व पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तातडीने बैठक घेऊन रस्ते कोणाच्याही मालकीचे असो ते त्वरित बुजवण्याचे आदेश दिले . त्यानुसार आता शहरातील हे खड्डे जेट पेचर या मशीनच्या मध्यममातून बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे . गेल्या दोन दिवसांत ३६२ खड्डे बुजवण्यात आले असून यामध्ये ५९१ स्केवर मीटर एरियामधील खड्डे बुजवण्यात आले आहेत .
बुजवण्यात आलेल्या खड्ड्यांमध्ये माजिवडा-मानपाडा विभागात ८७,वर्तकनगर भागात २५,वागळे भागात ४७,लोकमान्य नगर भागात ३१,नौपाडा भागात ४८,उथळसर भागात २०,कळवा परिसरात ३४,मुंब्रा ३६आणि दिवा ३४ असे एकूण ३६२ खड्डे बुजवण्यात आले आहेत .