मुंबई 21 : माहिती तंत्रज्ञान (आय. टी) क्षेत्रात अभियंता, कर्मचारी, कामगार यांच्या विविध समस्या आहेत. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीची बैठक घेऊन सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य श्रीकांत भारतीय यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
कामगार मंत्री श्री खाडे यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या विविध अभियंता, कर्मचारी, कामगार तसेच, काही व्यवस्थापन यांच्याकडून प्राप्त तक्रारी व निवेदने याचा विचार करून शासनाने सन २०१९ च्या शासन निर्णयानुसार त्रिपक्षीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये शासन प्रतिनिधी, कामगार प्रतिनिधी व व्यवस्थापन प्रतिनिधी यांचा समावेश आहे.
सर्वांशी विचारविनिमय करून त्यांच्या तक्रारींचे निवारण करणे तसेच ज्या समस्यांचे निराकरण समिती स्तरावर होऊ शकत नाही त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्यास, शासनास शिफारस करण्याबाबत समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे. यासाठी केंद्र शासनाचे मार्गदर्शन घेतले जाईल, असेही श्री. खाडे यांनी सांगितले.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, शशिकांत शिंदे, सुनील शिंदे यांनी सहभाग घेतला.