Thursday, June 20 2019 2:35 pm

आमदार सतेज पाटील यांच्या घराबाहेर काळा जादू

कोल्हापूर :- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथे काळ्या जादूचा प्रकार समोर आला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर एका आठवड्यात दोनदा भानामती करण्यात आली आहे. अमावास्येच्या रात्री (बुधवारी) पांढर्‍या कपड्यात हळद-कुंकू आणि बाहुली बांधून सतेज पाटलांच्या बंगल्यासमोरील झुडपांत टाकण्यात आली आहे. या प्रकारामुळे आमदार पाटील यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे.
आमदार सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणातील वजनदार व्यक्तीमत्व आहे. बुधवारी रात्री त्यांच्या बंगल्याबाहेर काळी बाहुली फेकण्यात आली होती. आमदार पाटील म्हणाले, ‘तुम्ही भानामती करा, नाही तर लिंबू बांधा, मला काही फरक पडत नाही. मी त्याला घाबरत पण नाही लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे भानामती आमच्या घराकडे येऊ लागली आहे. विरोधकांची ही खेळी असल्याचेही त्यांनी सांगितले आणि आमचं ठरलं आहे, कोणाला निवडून आणायचं. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. असंही सतेज पाटील म्हणाले.

कसबा बावडा येथे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा बंगला ‘यशवंत निवास’ आहे. बंगल्यासमोरच्या झुडुपांमध्ये चार दिवसांपूर्वी पांढऱ्या कपड्यात बांधलेली काळी बाहुली टाकण्यात आली होती. त्यानंतर गेल्या बुधवारी अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा बाहुली टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकांच्या तोंडावर काळ्या जादूचा वापर केला जात असल्याची जोरदार चर्चा सुरु झालील आहे.
दरम्यान, निवडणुकांच्या तोंडावर काळ्या जादू सारख्या अघोरी आणि अंधश्रद्धांचा वापर कोल्हापूर जिल्ह्याला नवीन नाही. यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याबरोबरच सेवा संस्थांच्या निवडणुकांमध्येही असा प्रकार समोर आला होता.