Friday, November 22 2019 7:56 am
ताजी बातमी

आपत्तीतून सावरण्यासाठी शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे :- जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजूरांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असून विमा कंपन्यांनी ताबोडतोड अटीशर्ती न ठेवता शेतकऱ्यांना मदत करावी. अशा सूचना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मंत्री, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या.

सर्व प्रशासकीय यंत्रणाना सोबत घेवून त्यांनी आज जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी आमदार शांताराम मोरे, राज्य हातमाग महामंडळ अध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, माजी आमदार पांडुरंग बरोरा, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, भिवंडी प्रांत डॉ. मोहन नळदकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री महोदय यांनी शेतकऱ्यांशी आश्वासक संवाद साधला.

 

जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड , कल्याण अंबरनाथ या ग्रामीण तालुक्यात ५५ हजार हेक्टर भाताची लागवड करण्यात आली होती, त्यापैकी या अवकाळी पावसामुळे ४१ हजार हेक्टर भातपिकाचे शंभरटक्के नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपये मिळावेत यासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

शेतकऱ्यांना सावरण्यासाठी रोजगार, अन्नसुरक्षा यासारख्या उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणांना दिले. तसेच दुष्काळी परिस्थितीत ज्या सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, पुढे रब्बी हंगाम असून पावसामुळे शेतात पिकाची नासाडी झाली आहे. हे पिक काढण्यासाठी मनरेगाच्या माध्यमातून साफसफाई करून, बी-बियाणांचा पुरवठा करण्यात यावा. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असेही ते म्हणाले. तसेच विमा कंपन्यांनी शासनाच्या अधिकाऱ्यांचे पंचनामे किंवा शेतकऱ्यांनी पाठवलेले फोटो ग्राह्य धरावे. बँकांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी कर्ज वसुलीचा तगादा लावू नये अशाही सूचना त्यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यातील मच्छीमार बांधवाचे झालेल्या नुकसानी बाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. यावेळी तालुक्यांचे तहसीलदार, जिल्हा कृषि अधिक्षक अंकुश माने, कृषि विकास अधिकारी मनोजकुमार ढगे, जि.प. सदस्य, प. स. सदस्य तसेच जिल्हा आणि तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.