Friday, May 24 2019 8:52 am

आधी धोरण ठरवा मगच पालिकेच्या वास्तूचा ठराव आणा: आमदार संजय केळकर

ठाणे : वादग्रस्त ठराव आणून ठाणेकर जनतेची विकासाच्या नावावर दिशाभूल करू नका नाही तर जनता माफ करणार नाही असा इशारा आमदार संजय केळकर यांनी कौसा स्टेडियम व शाहिद ओंबळे संकुलाच्या प्रस्तावित ठरावाच्या बाबतीत दिला. सत्ताधारी शिवसेनेने ५०० फूटापर्यंतच्या घरांना करमाफी करू असे आश्वासन देऊन ठाणेकर मतदारांची दिशाभूल करून मतं घेतली पण प्रत्यक्ष पाणीपट्टी, घरपट्टी वाढवण्याचा ठराव आणून ठाणेकरांचा विश्वासघात केला. 
      प्रायोगिक तत्वाच्या नावाने करोडो रुपये खर्च करून बांधलेली संकूल मर्जीतल्या लोकांना देण्याचा डाव उधळून लावण्याचे आवाहन विरोधी पक्षातल्या प्रतिनिधींनी व जागरूक ठाणेकरांनी केले आहे. ठाणेकरांच्या पैशातून ४ तलाव बांधले पण तीन तरण तलाव खाजगी संस्थाना चालवायला दिले. त्यामध्ये अनियमतात तर आहेच पण सुट्टीत विदयार्थ्यांना, तरुणांना या तलावाची एक तर फी परवडत नाही त्यामुळे त्याचा लाभ गरीब, मध्यमवर्गीय मुलांना होत नाही. यासंबंधी निश्चित धोरण ठरवा, नाहीतर या वास्तू, मैदान, संकुल, तरण तलाव हे धनदांडग्यांच्या घशात जातील आणि सामान्य नागरिक या पासून वंचित राहील असे आ. केळकर यांनी सांगितले. सत्ताधारी शिवसेनेने स्मशानभूमीच्या जागांचा असाच खेळ खंडोबा केला. स्वतःच ठराव मंजूर करायचे व नंतर त्याला विरोध करून श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा हे न समजायला जनता निश्चितच खुळी नाही. भाजप अशा प्रकारच्या जनहित विरोधी व वादग्रस्त प्रस्तवांना यापुढे देखील विरोध करेल असे आ. संजय केळकर यांनी सांगितले.