क्लस्टरसाठी मुख्यमंत्र्यांनी भूमीपूजन केलेल्या जागेतील इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांवर अन्याय..
ठाणे 01 -गोरगरीब रहिवाश्यांना घरकुल देणाऱ्या मुख्यमंत्र्याचा महात्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या क्लस्टर योजनेत कामगारांवर अन्याय झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. क्लस्टरचे भूमिपूजन झालेल्या वागळे इस्टेट येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूखंड क्रमांक एफ-२ या जमिनीवरील इंडियन रबर कंपनीच्या साडेचारशे कामगारांची कोट्यवधीची थकबाकी अद्याप मिळालेली नाही. तेव्हा, हतबल झालेल्या कामगारांनी रविवारी शासकिय विश्रामगृहात आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले.यावेळी आधी कामगारांची थकबाकी द्या, नंतरच क्लस्टरचे काम करा. असा इशारा आ. केळकर यांनी दिला असून मुख्यमंत्री सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आशिया खंडातील ठाण्यातील सर्वात जूनी औद्योगिक वसाहत असलेल्या वागळे इस्टेट रोड नं २२ येथील एमआयडीसी क्षेत्रातील भूखंड क्रमांक एफ – २ येथे १९६३ पासुन इंडियन रबर कंपनी होती.या कंपनीत ४६५ कामगार काम करीत, यापैकी ९० टवके कामगार मराठी होते. सन १९८२ मध्ये प्रजासत्ताक दिनी कंपनी अचानक बंद करण्यात आल्याने सर्व कामगार देशोधडीला लागले. कुठलीही देणी न देता कामगारांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. लेबर कोर्ट हायकोर्ट यांनी कामगारांच्या बाजुने निकाल दिला.परंतु काहीच न्याय मिळालेला नाही. मागील ३५ वर्षात वारंवार मागण्या आणि निवेदने देऊन देखील अद्याप दमडीही मिळालेली नाही; दरम्यान, थकबाकी मिळण्याच्या प्रतिक्षेत आतापर्यत या कंपनीतील २०० कामगार निधन पावले. पण थकबाकी मिळालेली नाही, आणि आता ही जागा क्लस्टरसाठी दिल्याने कामगार हतबल आणि संतप्त झाले आहेत. या कामगारांसाठी आमदार संजय केळकर सातत्याने लढा देत आहेत, प्रत्येक अधिवेशनात या कामगारांचा विषय आ. केळकर यांनी उचलला. तरीही अद्यापपावेतो या कामगारांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळे, संतप्त झालेल्या कामगारांनी शनिवारी क्लस्टरच्या भूमीपूजना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रविवारी आ. संजय केळकर यांनाही साकडे घातले. त्यानुसार, रविवारी शासकिय विश्रामगृहात कामगारांची बैठक घेतली. या बैठकीत, आधी कामगारांची थकबाकी द्यावी, नंतरच क्लस्टरचे काम करा. असा सूचनावजा इशारा दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वसामान्य कामगारांची व्यथा जाणुन सकारात्मक निर्णय घेतील असा आशावादही आ. केळकर यांनी व्यक्त केला आहे.
१० वर्षानंतरही पदरी आश्वासन
या कंपनीच्या कामगारांनी शनिवारी क्लस्टरच्या भूमीपूजना दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देऊन दिले. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले आहे. दरम्यान, १० वर्षापुर्वी देखील ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले होते. त्यावेळीही त्यांनी हेच आश्वासन दिले होते. असे या कंपनीचे वृद्ध कामगार शिवाजी सुकाळे यांनी सांगितले. तसेच, आ. संजय केळकर सातत्याने पाठीशी उभे राहिल्या बद्दल ऋण व्यक्त केले.