Friday, December 13 2024 10:36 am

आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ( क्षेत्रांतर्गत / क्षेत्रा बाहेरील) ही सिंचनप्रधान योजना कृषी विभाग, जिल्हा परिषद ठाणे या विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येते.
अनुदान
या योजनेंतर्गत नवीन विहीर (रु.2.50 लाख), जुनी विहीर दुरुस्ती (रु.50 हजार), इनवेल बोअरींग (रु.20 हजार), वीज जोडणी आकार (रु.10 हजार), शेततळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण (रु.1 लाख), सुक्ष्म सिंचन संच (ठिबक सिंचन संच-रु.50 हजार किंवा तुषार सिंचन संच-रु.25 हजार), परसबाग (रु.500), पीव्हीसी पाईप (रु.30 हजार), पंप संच (रु.20 हजार), व या बाबींवर अनुदान अनुज्ञेय आहे. सदर योजनेअंतर्गत वरील बाबींचा समावेश असला तरी या योजनांचा लाभ पॅकेज स्वरुपात देय आहे असे एकूण तीन पॅकेज असून एका पॅकेजचा लाभ देय राहील.

१. नवीन विहीर याबाबत

सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन विहीर, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक/ तुषार), पंपसंच, पीव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग या बाबींचा लाभ देय आहे. शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करताना त्यास लाभ घ्यावयाच्या आवश्यक त्या बाबींची अर्जामध्ये मागणी करणे आवश्यक आहे. मात्र यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभार्थ्यांने नवीन विहीर या बाबीचा लाभ घेतलेला नसावा.

२. जुनी विहीर दुरुस्ती

सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना जुनी विहीर, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक/ तुषार), पंपसंच, पीव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग या बाबींचा लाभ देय आहे. शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करताना त्यास लाभ घ्यावयाच्या आवश्यक त्या बाबींची अर्जामध्ये मागणी करणे आवश्यक आहे. मात्र यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभार्थ्यांने विहीर घटकाचा लाभ घेतलेला नसावा.

३. शेततळ्यास अस्तरीकरण

सदर पॅकेज अंतर्गत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना शेततळ्याचे प्लस्टिक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक/ तुषार), पंपसंच, पीव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग या बाबींचा लाभ देय आहे. शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज सादर करताना त्यास लाभ घ्यावयाच्या आवश्यक त्या बाबींची अर्जामध्ये मागणी करणे आवश्यक आहे. मात्र यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभार्थ्यांने नवीन विहीर, जुनी विहीर दुरूस्ती घटकाचा लाभ घेतलेला नसावा.
ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी शासकीय योजनेतून विहीर घेतली असेल अथवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशा शेतकऱ्यांना वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच (ठिबक/ तुषार), पंपसंच, पीव्हीसी/एचडीपीई पाईप, परसबाग यासाठी अनुदान देय राहील. अर्जदार शेतकऱ्यांने ऑनलाइन अर्ज करताना त्यास लाभ द्यावयाच्या बाबींची अर्जामध्ये मागणी करणे आवश्यक आहे.

पात्रता
• लाभार्थी अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे.
• लाभार्थीने जातीचा वैध दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
• जमिनीच्या 7/12 व 8-अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.
• लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये दीड लाख पेक्षा जास्त नसावे तसा तहसिलदार यांचेकडील अद्ययावत उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
• उत्पन्नाचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
• लाभार्थीची जमिनधारणा 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत (नवीन विहिरीसाठी किमान 0.40 हेक्टर) असणे बंधनकारक आहे. ( दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल ६ हेक्टर धारण क्षेत्राची अट लागू नाही)
• एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील ५ वर्षे त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय नाही.
• लाभार्थीकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
• लाभार्थीचे स्वतःचे बँक खाते त्याच्या आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
• बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत परंपरागत वन निवासी (वन अधिकारी मान्यता) अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकऱ्यांना प्राधान्य आहे.
• ग्रामसभा ठराव

आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी हि योजना राबविली जात आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी या https://mahadbt.maharashtra.gov.in/ या पोर्टलद्वारे देखील ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच ऑनलाईन अर्ज केल्यानंतर आवश्यक सर्व मूळ कागदपत्रासह आपला प्रस्ताव संबंधीत पंचायत कार्यालयातील कृषी अधिकारी यांच्याकडे वेळेत स्वहस्ते सादर करावा व अर्जाची पोहोच घ्यावी – कृषी विकास अधिकारी श्रीम. सारीका शेलार.