मुंबई, 17 – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ जाहीर झाली असून प्रशासनाने सर्व आवश्यक ती तयारी केली आहे. मतदानाचे प्रमाण वाढावे, अधिकाधिक नागरिकांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा विशेष प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. मतदान वाढण्यासाठी राजकीय पक्षांनीदेखील आपापल्या स्तरावर सहकार्य करावे, तसेच आदर्श आचारसंहिता व निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणीत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी यांनी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा क्षेत्रातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज (दिनांक १६ ऑक्टोबर २०२४) बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई शहर जिल्हाधिकारी श्री. संजय यादव, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. भूषण गगराणी यांनी बैठकीत सांगितले की, महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांकरिता विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ कार्यक्रम जाहीर झाला आहे. काल दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितेचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. विद्रूपीकरण कायदा १९९५ नुसार सर्व बॅनर्स, पोस्टर्स, स्टिकर, जाहिरात फलक इत्यादी तात्काळ काढण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरु केली आहे. सर्व राजकीय पक्षांनी देखील यामध्ये सहकार्य करावे. ज्या ठिकाणी नियमानुसार परवानगी आहे, त्या ठिकाणी विहित पद्धतीने परवानगी घेतल्यानंतरच राजकीय पक्षांनी बॅनर्स, पोस्टर्स इत्यादी लावणे अपेक्षित आहे, असे श्री. गगराणी यांनी नमूद केले.
पुढे ते म्हणाले की, नागरी क्षेत्रात मतदानाचे कमी प्रमाण हा माननीय निवडणूक आयोगाच्या दृष्टीने काळजीचा विषय आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. यंदा देखील माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वेगवेगळ्या उपाययोजना आणि जनजागृती देखील करण्यात येत आहे. ज्या पात्र मतदारांनी अद्याप मतदार नोंदणी केलेली नाही त्यांना, निवडणुकीसाठी उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या दहा दिवस अगोदरपर्यंत सहा क्रमांकाचा अर्ज करून नोंदणी करता येते. या नियमानुसार, यंदा दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदारांना नाव नोंदणी करता येईल. त्याचप्रमाणे नाव कमी करणे, नावात दुरुस्ती करणे याबाबत देखील समान प्रक्रिया आणि मुदत आहे, अशी माहिती देखील श्री. गगराणी यांनी बैठकीत दिली.
आपले मतदान केंद्र जाणून घ्या या अभियानाविषयी माहिती देताना श्री. गगराणी म्हणाले की, लोकसभा निवडणूक २०२४ नंतर सर्वत्र मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये वाढ आणि बदल झाले आहेत, त्या सर्व ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे प्रत्येक कुटुंब आणि मतदार यांच्यापर्यंत पोहोचून मतदान केंद्रांची माहिती लेखी स्वरूपात पोचवत आहेत. त्यासाठी आपले मतदान केंद्र जाणून घ्या अर्थात Know Your Polling Station ही मोहीम व्यापक स्तरावर राबवली जात आहे. राजकीय पक्षांनी देखील आपापल्या स्तरावर याबाबत खात्री करावी. बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती करून घ्यावी आणि मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती पोहोचवून सहकार्य करावे, असे आवाहन श्री. गगराणी यांनी केले.
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई उपनगर जिल्हाधिकारी श्री. राजेंद्र क्षीरसागर म्हणाले की, मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करतानाच, प्रत्येक मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रांगेत उभे असलेल्या मतदारांसाठी आसन व्यवस्था, स्वच्छतागृहे इत्यादी निश्चित किमान सुविधांची (Assured Minimum Facility) पूर्तता करण्यात येणार आहे. मतदान केंद्रांवर मतदारांची गैरसोय होऊ नये, याची विशेषत्वाने काळजी घेण्यात येत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर करावयाच्या कार्यवाही बाबत स्वतंत्रपणे बैठका घेण्यात येतील. त्यामध्ये नामनिर्देशन, निवडणूक कार्यक्रम, मतदान संयंत्र आणि इतर मुद्द्यांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल, अशी माहिती श्री. क्षीरसागर यांनी दिली.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मांडलेले विचार व सूचना जाणून घेतल्यानंतर समारोप करताना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गगराणी यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ७७ व ७८ नुसार खर्च मर्यादा आणि निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे इत्यादी बाबत तरतुदी आहेत. तसेच कलम १२७क नुसार छपाई करावयाच्या पोस्टर्स, बॅनर्स इत्यादींबाबत तरतुदी आहेत. कलम १२८ नुसार मतदानाची गोपनीयता ठेवण्यासंदर्भात तरतूद आहे. विविध कायदे आणि माननीय भारत निवडणूक आयोग यांनी वेळोवेळी निर्देशित केलेल्या सूचनांचे देखील पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. सर्व राजकीय पक्षांना त्याबाबत वेळोवेळी अवगत केले जाते. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक विषयक कायदे व तरतुदी याचे सर्वांनी योग्य पालन करणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील श्री. गगराणी यांनी बैठकीच्या अखेरीस केले.