Saturday, September 18 2021 12:21 pm
ताजी बातमी

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

यवतमाळ : 
लोकसभा निवडणुकीत वाशिम लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष लागून राहिले आहे. प्रहार संघटनेच्या तिकीटावर वैशाली येडे निवडणूक लढत आहेत. आत्महत्या केलेले शेतकरी सुधाकर येडे यांच्या त्या पत्नी…
वैशाली येडे या यवतमाळ येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमलेनाच्या उदघाटक होत्या. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढत आहेत. शेतीतली नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून पती सुधाकर यांनी आत्महत्या केली होती. मात्र परिस्थितीशी दोन हात करत वैशाली यांनी कुटुंबाचा सांभाळ केला. एकट्याने आयुष्य जगणाऱ्या अनेक शेतकरी पत्नींनाही धीर दिला. साहित्य संमेलनातलं त्यांचं भाषणही गाजलं होतं.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची बाजू तळमळीने मांडली होती.
वैशाली येडे यांना दोन मुलं आहेत. तीन एकर शेती आहे. राजूर इथे अंगणवाडी सहाय्यिका म्हणून त्या काम करतात. शेतकरी आत्महत्या या विषयावरील तेरवं या नाटकातही त्या प्रमुख भूमिका केली आहे. वैशाली येडे यांच्या प्रचारासाठी सर्वसामान्य नागरिक पुढे येत असल्याचं चित्रं आहे. अनेकांनी मदत निधी दिलाय. दुबईवरूनही मदतीचा धनादेश आलाय. कुणी प्रचार रथ पाठवलाय. तर कुणी रोख स्वरूपात मदत दिलीय. सामान्यतः निवडणुकीसाठी उमेदवार निवडताना त्यांच्या आर्थिक आणि बाहुशक्तीचा विचार होतो. त्यानंतर उमेदवारी दिली जाते. पण वैशाली येडे यांच्या उमेदवारीमुळे मात्र एक वेगळं उदाहरण प्रहार संघटनेनं घालून दिलं आहे.