Saturday, July 11 2020 10:56 am

९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

उस्मानाबाद : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला असलेली वादाची परंपरा यंदाही कायम आहे. या वेळी संमेलनाध्यक्ष निवड वा मानपानावरून नव्हे, तर माजी संमेलनाध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे. भोपाळमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात सावरकरांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी असलेली पुस्तिका वाटण्यात आली होती. त्याच्या निषेधाचा ठराव ९३ व्या साहित्य संमेलनात घ्यावा, अशी मागणी वीर सावरकर विचार परिवारने साहित्य महामंडळाकडे केली आहे. असा ठराव घेतल्यास आम्ही संमेलनातच निषेध करू, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.

उस्मानाबादेत शुक्रवारपासून ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वीर सावरकर विचार परिवारच्या वतीने संमेलनाच्या स्वागतध्यक्षांना दिलेल्या निवेदनात सावरकरांविषयी सेवा दलाच्या पुस्तिकेतील मजकुरावर आक्षेप घेण्यात आला आहे. भोपाळच्या अधिवेशनात सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ भाषा असलेली ही पुस्तके वितरित केली गेली. १९३८ मध्ये मुंबईमध्ये पार पडलेल्या २३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सावरकर होते. त्यामुळे सावरकरांवरील वक्तव्याचा निषेध करणारा ठराव साहित्य संमेलनात मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यंदा संमेलनात अनेक कलाकृती साकारण्यात आल्या असून त्यापैकी संत गोरोबाकाकांचे निवासस्थान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यासमोर गाडगे बनवण्याचा आवा, शेणाने सारवलेले अंगण, अशी हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे.