Tuesday, January 19 2021 10:33 pm

आजपासून राज्यातील न्यायालये दोन सत्रात सुरू

मुंबई : गेल्या आठ महिन्यापासून न्यायालय पूर्ण वेळेत सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या पुण्यातील वकील, पक्षकारांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पुणे जिल्हा न्यायालय वगळता राज्यातील इतर न्यायालये आजपासून दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात येणार आहेत.

उच्च न्यायालयाने पुणे शहर वगळून इतर न्यायालयाने सुरू करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वकील वर्गापुढील अडचणीत वाढ झाली आहे. आठ महिन्यापासून न्यायालयातील कामकाज ठप्प असल्यामुळे न्यायालयात प्रॅक्टिस करणाऱ्या तरुण वकिलापुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यात पुण्यातील न्यायालय पूर्णवेळेत सुरू होईल अशी आशा होती. त्यादृष्टीने वकील वर्गाने तयारी देखील सुरू केली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व न्यायालयातील कामकाजाला २३ मार्चपासून खीळ बसली आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील न्यायालयातील कामकाज सध्या एकाच शिफ्टमध्ये सुरू असून फक्त महत्वाच्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.

मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आजपासून राज्यातील न्यायालयातील कामकाज दोन शिफ्ट मध्ये सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक न्यायिक शिफ्ट अडीच तासाची असणार आहे. सकाळी अकरा ते दुपारी दीड आणि दुपारी दोन ते सायंकाळी साडेचार यावेळेत कामकाज सुरु राहणार आहे. तसेच न्यायाधीशांची आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची १०० टक्के उपस्थिती असणार आहे.

पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी बोलताना सांगितले की, पुण्यातील न्यायालय देखील दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याबाबत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्राला पत्र पाठवले आहे. त्यानुसार आज (दि. १) बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्यात बैठक होणार असून पुण्यातील न्यायालय दोन शिफ्टमध्ये सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.