Wednesday, March 26 2025 4:59 pm

आजपासून रंगणार संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव

• डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार महोत्सव
• पं. राम मराठे स्मृती पुरस्कारांचे होणार वितरण
• संगीत महोत्सवाचे २९वे वर्ष
• रसिकांना विनामूल्य प्रवेश

ठाणे 14 : ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सव आज, शुक्रवार, १४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. महोत्सवाची सुरूवात पं. राम मराठे यांची नात आणि युवा कलाकार प्राजक्ता मराठे-बिचोलकर यांच्या गायनाने होईल. तर, उत्तरार्धात ख्यातनाम गायक पं. अजय पोहनकर यांचे गायन होणार आहे. त्यापूर्वी, पं. राम मराठे स्मृती पुरस्कारांचे वितरण होईल.
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे तीन दिवस होणाऱ्या या महोत्सवास रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. महोत्सवाचे हे २९वे वर्ष आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात, ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. विश्वनाथ कान्हेरे यांना राज्यस्तरीय तसेच गायिका वेदश्री खाडिलकर-ओक यांना युवा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
शुक्रवारी महोत्सवाचा आरंभ सायंकाळी ६.०० वा. प्राजक्ता मराठे-बिचोलकर यांच्या गायनाने होईल. त्यांना स्वप्नील भिसे आणि ज्ञानेश्वर सोनावणे साथ करणार आहेत. त्यानंतर, सौरव-गौरव मिश्रा यांची कथ्थक जुगलबंदी होईल. पहिल्या दिवसाची सांगता ख्यातनाम ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने होईल. त्यांना अजय जोगळेकर आणि ओजस अधिया साथ करणार आहेत.
रसिकांसाठी रंगायतन ते घाणेकर नाट्यगृह सशुल्क बस व्यवस्था
या महोत्सवासाठी राम गणेश गडकरी रंगायतन ते डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह तसेच, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ते राम गणेश गडकरी रंगायतन या प्रवासासाठी ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेमार्फत सशुल्क बस व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे.