• शनिवार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता.
• स्थळ – काशिनाथ घाणेकर मिनी प्रेक्षागृह
• ठाणे महानगरपालिकेची ‘विचारमंथन व्याख्यानमाला’
• सातवे पुष्प
ठाणे (08) : मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ पत्रकार श्री. श्रीकांत बोजेवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ‘विचारमंथन व्याख्यानमाले’तील हे सातवे पुष्प असून हे ‘आचार्य अत्रे यांचे व्यक्तिमत्व आणि विचार’, याविषयावरील हे व्याख्यान शनिवार, १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये होणार आहे. हे व्याख्यान सगळ्यांसाठी खुले आहे.
आचार्य अत्रे यांचे शिक्षण सासवड, पुणे, मुबंई व लंडन या ठिकाणी बी. ए., बी. टी., टी. डी. पर्यंत झाले. नंतर पुण्यातील कँप एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत प्रथम शिक्षक व पुढे प्राचार्य म्हणून काम केले. तेथे असतानाच राजा धनराज गिरजी हायस्कूल (१९२७) व मुलींचे आगरकर हायस्कूल (१९३४) या शाळांच्या संस्थापनेत भाग घेतला. पुण्याच्या नगरपालिकेचे काही काळ ते सदस्य होते. १९३३ पासून नाट्यक्षेत्रात व पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. १९४०मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्रक्षेत्रातच ते राहिले. याचबरोबरच ‘अत्रे थिएटर्स’ या नाट्य संस्थेमार्फत रंगभूमीशी त्यांचे व्यावसायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी व लेखणी यांद्वारे मोठे कार्य केले.
त्यांनी प्रथम ‘मकरंद’ व नंतर ‘केशवकुमार’ या टोपणनावांनी काव्यलेखन केले. झेंडूची फुले (१९२५) हा त्यांच्या विनोदी व विबंडन-कवितांचा संग्रह. अत्रे यांनी साष्टांग नमस्कार (१९३३), भ्रमाचा भोपळा (१९३५) व लग्नाची बेडी (१९३६), घराबाहेर (१९३४). उद्याचा संसार (१९३६), तो मी नव्हेच (१९६२) व डॉक्टर (१९६७) आदी नाटके लिहिली.
विविध विषयांवर अत्र्यांनी केलेल्या लेखनात लहानमोठी चरित्रे, व्यक्तिदर्शने, मृत्यूलेख, प्रवासवर्णने, वृत्तपत्रीय लेख, साहित्य विषयक लेख आणि भाषणे, शालेय पाठ्यपुस्तके इत्यादींचा समावेश होतो. महात्मा फुले (१९५८), पंडित जवाहरलाल नेहरूंवरील सूर्यास्त (१९६४), समाधीवरील अश्रू (१९५६), केल्याने देशाटन (१९६१), अत्रे उवाच (१९३७) ललित वाङ्मय (१९४४), हशा आणि टाळ्या (१९५८) ही त्यांची काही उल्लेखनीय पुस्तके होत. त्यांच्या नवयुग वाचनमाला (१९३७) व सुभाष वाचनमाला (१९६२) यांनी-विशेषत: पहिल्या मालेने-मराठी भाषासाहित्यविषयक शालेय पाठ्यपुस्तकाचा मराठीत एक आदर्शच निर्माण केला. मी कसा झालो? (१९५३) हे त्यांचे वाङ्मयीन आत्मशोधन होय. अत्र्यांनी आपले जीवननाट्य अत्यंत रसाळ व भावपूर्ण शैलीने प्रस्तुत पुस्तकात निवेदन केले असल्याने मराठी आत्मचरित्रपर साहित्यात त्यास विशेष महत्वाचे स्थान आहे. कऱ्हेचे पाणी या पाच खंडांतील विस्तृत आत्मचरित्रात आपली जीवनकथा त्यांनी सांगितली आहे.
अत्र्यांच्या स्वतंत्र वृत्तपत्रव्यवसायाचा आरंभ साप्ताहिक नवयुगपासून (१९४० ते १९६२) झाला. १९४३–१९४४त समीक्षक मासिकाच्या गडकरी विशेषांकाचे व दिवाळी अंकाचे संपादन त्यांनी केले. १९४७–१९४८ या वर्षांत जयहिंद नावाचे एक सायंदैनिकही त्यांनी चालविले. तुकाराम (१९५४) नावाचे साप्ताहिकही त्यांनी काढले होते. १९५६ मध्ये सुरू केलेल्या दैनिक मराठाचे ते अखेरपर्यंत संपादक होते.
मराठी चित्रपटसृष्टीत पटकथालेखक म्हणून व पुढे स्वतंत्र निर्माते म्हणून अत्र्यांनी महत्त्वाचे कार्य केले.धर्मवीर, प्रेमवीर, ब्रह्मचारी व ब्रँडीची बाटली हे त्यांचे काही लोकप्रिय चित्रपट होत. त्यांच्या श्यामची आई या चित्रपटास राष्ट्रपतींचे सुवर्णपदक (१९५४) व महात्मा फुले या चित्रपटास रौप्यपदक (१९५५) मिळाले.
त्यांच्या राजकीय कर्तृत्वाचा विकास संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात झाला. वक्तृत्व व वृत्तपत्र ही राजकीय कार्याची त्यांची प्रभावी साधने होती. नाशिक येथे १९४२ मध्ये भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य-संमेलनाचे ते अध्यक्ष होते. अडतिसावे नाट्यसंमेलन (बेळगाव, १९५५), दहावे मराठी पत्रकार-संमेलन (१९५०) आणि बडोदे, इंदूर व ग्वाल्हेर येथील प्रादेशिक साहित्यसंमेलने यांची अध्यक्षपदेही त्यांनी विभूषित केली होती.
वक्ते – श्री. श्रीकांत बोजेवार
आचार्य अत्रे यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र टाइम्सचे सल्लागार श्री. श्रीकांत बोजेवार घेणार आहेत. सिद्धहस्त लेखक असलेले श्री. बोजेवार १९९०पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. सकाळ, लोकसत्ता याही वर्तमानपत्रात काम केले. तंबी दुराई या नावाने ते करत असलेले सदर लेखन लोकप्रिय आहे. प्रभात चित्र मंडळ, एशियन फिल्म फाऊंडेशन या संस्थांशी ते निगडित असून महाराष्ट्राचा सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय पट हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. आचार्य अत्रे यांच्या जीवनपटाच्या लिखाणाच्या निमित्ताने श्री. बोजेवार यांनी अत्रे यांच्या समग्र साहित्याचा, व्यक्तिमत्वाचा सखोल अभ्यास केला आहे.
विचारमंथन व्याख्यानमाला
ठाणे महापालिकेच्या वतीने महनीय व्यक्तींच्या जयंती तसेच पुण्यतिथीला त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाते. त्याचबरोबरीने, ज्या महनीय व्यक्तींचे स्मरण केले जाते, त्यांचे कार्य व माहिती कळावी, त्यांच्या विचारांचा जागर व्हावा यासाठी ‘विचारमंथन व्याख्यानमाले’त मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित केले जाते. या व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प असून ठाणेकरांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी केले आहे.
महनीय व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत. तसेच, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे ‘विचारमंथन व्याख्यानमाले’चे प्रयोजन असल्याचेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले आहे. आजवर या व्याख्यानमालेत श्री. बाबा भांड, श्री. हरी नरके, प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, प्रा. डॉ. शरद गायकवाड, प्रा. डॉ. रमेश जाधव आणि डॉ. सदानंद मोरे यांनी महनीय व्यक्तिमत्वांची वैशिष्ट्ये उलगडून दाखवणारी व्याख्याने दिली आहेत.