Thursday, December 5 2024 6:51 am

आई बाबा सामाजिक संस्थेतर्फे २ हजार विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांची भेट

जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम.

ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) : आई-बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक १९ व २९ मधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांची भेट मिळाली आहे. ज्युनियर केजी ते पदवीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना काल शाळा सुरू होण्याच्या आदल्यादिवशी वह्या मिळाल्या. संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांच्याकडून १५ वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे.

महागिरी कोळीवाडा येथील एकविरा मित्र मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांची उपस्थिती होती. २००८ पासून निरपेक्ष भावनेने सुरू असलेल्या वह्या व पुस्तके वाटप कार्यक्रमाचे आमदार डावखरे व आमदार केळकर यांनी कौतुक केले. आई-बाबा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दांत दोन्ही नेत्यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला स्थायी समितीचे माजी सभापती संजय वाघुले, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुनील हंडोरे, भाजपाच्या राजस्थान सेलचे अध्यक्ष महेंद्र जैन, ओबीसी सेलचे नरेश ठाकूर, समाजसेविका डॉ. सोनल चव्हाण, डॉ. पल्लवी कोळी आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.