Friday, December 13 2024 11:34 am

‘आंबेघोसाळे तलाव परिसरातील कामे जलद पूर्ण होतील’

महापालिका आयुक्त सौरभ राव यांची ग्वाही
उथळसर प्रभागात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

ठाणे, ०४ : आंबे घोसाळे तलाव परिसरातील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच, ज्येष्ठ नागरिकांनी मांडलेल्या सूचनांचा विचार करुन प्रशासन आवश्यक कार्यवाही करेल, अशी ग्वाही ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

शनिवारी सकाळी ७.०० वाजता उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेस आरंभ झाला. आंबेघोसाळे तलाव, मीनाताई ठाकरे चौक परिसर, के व्हीला, राबोडी, ऋतू पार्क आदी भागात या मोहिमेत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात, रोटरी क्लब, शिवशांती प्रतिष्ठान, स्थानिक नागरिक, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले.

या मोहिमे दरम्यान आयुक्त राव यांनी आंबे घोसाळे तलाव परिसराची पाहणी केली. त्यावेळी, स्थानिक नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी यांच्याशी आयुक्तांनी संवाद साधला. शौचालयातील पाण्याची समस्या, स्वच्छता, परिसरात टाकला जाणारा कचरा याविषयी नागरिकांनी माहिती दिली. तसेच, सौंदर्यीकरण कामाबाबत सूचनाही केल्या. या तळ्याला लागून असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याच्या परिसर, मीनाताई ठाकरे चौक परिसर यांचीही आयुक्तांनी पाहणी केली.

ज्येष्ठ नागरिकांनी केलेल्या सूचनांचा पूर्ण विचार करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. या परिसरात नागरिकांना अधिकाधिक स्वच्छ आणि सुंदर वातावरण कसे मिळेल या दृष्टीने महापालिका प्रयत्न करेल, असेही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.

या वेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरीक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, जी. जी. गोदेपुरे, दिनेश तायडे, अनघा कदम, सचिन पवार, सहायक आयुक्त महेश आहेर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उप नगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, गुणवंत झांब्रे, कार्यकारी अभियंता संजय कदम, मोहन कलाल, वृक्ष अधिकारी केदार पाटील आदी उपस्थित होते.

नालेसफाईचा आढावा

उथळसर मधील मुख्य नाल्याच्या सफाईचा आढावा यावेळी आयुक्त राव यांनी घेतला. नाले सफाई वेळेत पूर्ण करण्यावर विभागाने लक्ष ठेवावे, असे निर्देश आयुक्तांनी पाहणी नंतर दिले.