ठाणे, 20- जिल्ह्यातील अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन या विरोधात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच त्यांच्या अधिनस्त असलेल्या तहसील व उपविभागीय अधिकारी कार्यालयांमार्फत धडक मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रेतीगट शाखेचे अधिकारी तसेच कल्याण व डोंबिवलीतील महसूल अधिकारीऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीत अवैध उत्खनन करणाऱ्या दोन बार्ज व दोन संक्शन पंप अशी सुमारे सुमारे 50 लाख रुपये किमतीचे मालमत्ता जप्त करून त्याची खाडीच्या पाण्यात विल्हेवाट लावण्यात आली. तसेच यावेळी घोडबंदर रोडवरील रेतीबंदर येथील कारवाईत 130 ब्रास रेती पुन्हा खाडीमध्ये ढकलण्यात आली. तर 97 ब्रास रेती व 78 ब्रास दगड पावडर जप्त करून पंचनामा करण्यात आले आहे.
राज्य शासनामार्फत दिलेल्या सूचनानुसार गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी महाखनिज प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. या अद्यावत प्रणालीद्वारे जिल्ह्यात नोंदणी व वाहतूक परवाने निर्गमित करण्याचे काम करण्यात येते आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 1 एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 11824 वाहनांची महाखनिज प्रणालीवर ऑनलाइन तपासणी करण्यात आलेली असून 195 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून रुपये 286 लाख 53 हजार एवढ्या महसुलाची वसुली करण्यात आलेली आहे.
ठाणे खाडी व परिसरामध्ये अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध 1 एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 46 कारवाई करण्यात आल्या आहेत. यामध्ये 63 सक्शन पंप, 2 बार्ज व 3746 ब्रास रेतीसाठा जप्त करून त्याचा लिलाव करण्यात आला आहे. प्रकरणी याबाबत 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
या मोहिमेअंतर्गत आज दि. 20 जानेवारी 2023 रोजी रेतीगट शाखेचे तहसीलदार तसेच कल्याण व डोंबिवलीचे तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या पथकाने कल्याण व डोंबिवली येथील बंदरातून विशेष तपासणी मोहिमेस सुरूवात केली. त्यावेळी या पथकांना खाडीमध्ये दोन बार्ज व दोन संक्शन पंप अवैध रेती उत्खनन करताना आढळून आले. दोन्ही संक्शन पंप गॅस कटरच्या सहाय्याने पूर्ण कट करून खोल पाण्यात बुडविण्यात आले. तसेच दोन्ही बार्जच्या इंजिनामध्ये साखर टाकून ती निकामी करण्यात आली. तसेच इंजिनही कटरच्या सहाय्याने कट करून इंजिन पेटवून देण्यात आले. निकामी करण्यात आलेल्या या दोन्ही बार्जची अंदाजे किमत ही 40 लाख तर दोन्ही सक्शन पंपांची अंदाजे किमत 10 लाख रुपये अशा एकूण अंदाजे 50 लाखांची मालमत्ता निकामी करण्यात आली असल्याचे महसूल प्रशासनाने कळविले आहे. तसेच रेतीबंदर येथे केलेल्या कारवाईत 130 ब्रास रेती खाडीमध्ये ढकलण्यात आली आहे. 97 ब्रास रेती व 78 ब्रास दगड पावडर जप्त केले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळविली आहे.
जिल्ह्यातील गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याच्यादृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व अपर जिल्हाधिकारी मनीषा जयभाये धुळे यांनी जिल्हा प्रशासनास दिले आहेत.
0000