Thursday, August 22 2019 3:43 am

अल्पसंख्याक शिक्षकांना न्याय देण्यासाठी शिवसेना उद्या नवी मुंबईत रस्त्यावर उतरणार 

शिवसेना आमदार प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांचा नगर युवक शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभाराविरुद्ध धडक मोर्चा
नवी मुंबई : – नगर युवक शिक्षण संस्थेअंतर्गत अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षण सेनेच्या वतीने उद्या शुक्रवार ८ फेब्रुवारी, २०१९  रोजी सकाळी ११. ३० वाजता ऐरोली येथील सेक्टर ३ येथील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालया वर धडक मोर्चा नेणार असून संस्थेच्या प्रशासनाला त्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध जाब विचारण्यात येईल. हा मोर्चा  शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष श्री अजित चव्हाण, उपाध्यक्ष अरविंद नाईक तसेच मुंबई विभागाच्या महिला आघाडी अध्यक्ष श्रीमती मानसी चाळके व शिक्षक सेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना शिवसेना आमदार प्रा. डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, “सदर संस्थेला  राज्य अल्पसंख्याक आयोगाने अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या गंभीर तक्रारीबाबत खुलासा मागविला होता परंतु येथील कर्माचाऱ्यांच्या आर्थीक व  मानसिक शोषणा बाबत तक्रारीच्या अनुषंगाने योग्य खुलासा केलेला नाही. नगर युवक शिक्षण संस्थेने दिलेल्या खुल्याशामुळे अल्पसंख्याक आयोगाचे सुद्धा समाधान झालेले नाही. शासकीय नियमानुसार सर्व कर्मचाऱ्यांना १४२ टक्के महागाई भत्ता देण्यात येत असताना ही संस्था फक्त ७७ टक्के महागाई भत्ता देत आहे. कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सुट्ट्या, किरकोळ रजा, अर्जित रजा, व वैद्यकीय रजा मंजूर करण्यात येत नाहीत तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन १ तारखेऐवजी १५ ते २५ तारखेपर्यंत करण्यात येते व त्यामुळे कर्मचाऱ्यांना भुगतान करावयाच्या रकमा (देणी ) वेळीच भरता न आल्यामुळे दंडात्मक रकमेचा नाहक भुर्दड सोसावा लागत आहे. मागील २ वर्षांपासून सलीम शेख व अनिल जाधव यांच्या वेतनातून दरमहा रु ५०००/- अनधिकृतपणे कपात केली जात आहे.”