Monday, October 26 2020 4:13 pm

अरे देवा… महिलांच्या लोकल प्रवासाचं अजून ठरलं नाही

मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे सरकारने सरसकट सर्व महिलांना लोकल प्रवासासाठी १७ ऑक्टोबर पासून मुभा दिली आहे. तरीही अद्याप यासाठी केंद्रीय रेल्वे बोर्डाने मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे महिलांना सरसकट लोकलमधून प्रवास करता येणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे. काही वेळापूर्वीच ठाकरे सरकारने याबाबतची घोषणा केली असली तरीही केंद्रीय रेल्वे बोर्डाने यासाठी मंजुरी दिलेली नाही.

पश्चिम रेल्वेने याबाबत एक पत्रक काढलं आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिलांना मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करू देण्यासाठी राज्य सरकारने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर उद्यापासूनच महिलांना लोकल प्रवास करता येणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यावर आता मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने राज्य सरकारला उत्तर दिलं आहे.

लोकल रेल्वेमधून प्रवास सुरू करण्यासाठी त्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जाणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महिला प्रवाशांना परवानगी दिल्यास किती गोष्टींवरचा ताण वाढू शकतो, त्यासाठी काय तजवीज करावी लागू शकते, यासंदर्भात एकत्र बसून चर्चा करण्यासाठी रेल्वेने राज्य सरकारला आमंत्रित केलं आहे. त्या चर्चेमध्ये होणाऱ्या निर्णयानंतरच नक्की कधीपर्यंत महिलांना प्रवासाची परवानगी दिली जाऊ शकते.

रेल्वे प्रशासनाशी आधी चर्चा न करताच एका दिवसात महिलांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला? इतक्या मोठ्या प्रमाणावर तजवीज करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला एक दिवसाचा अवधी पुरेसा ठरेल का? असे काही प्रश्न आता चर्चेत येऊ लागले आहेत.