ठाणे 19 : करोडो हिंदूच्या नजरा आता अयोध्येतील मंदिरामधील प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे लक्ष लागले आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली असून अयोध्येत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बोलबाला पाहण्यास मिळत आहे. त्यातच ठाणेकर असलेले विकास दाभाडे तसेच बालाआणि रीना मुदलियार या दांपत्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे स्वागतार्थ आयोध्यातील मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख 36 नाक्यावर बॅनरबाजी करत शिंदेशाहीची जणू एक झलक अयोध्यावासीयांना करून दिली आहे.
सुमारे 500 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारले गेले आहे. या मंदिरातील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होत आहे, याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देश राममय झाला आहे. याच राम मंदिर याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील स्थानिक पातळीवर राजकीय पक्षांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर या सोहळ्यानिमित्त राजकीय पक्षांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी केली आहे. अशाप्रकारे ठाणेकर नागरिक अयोध्यात पोहोचले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या स्वागतार्थ एक- दोन नाहीतर तीन डझन म्हणजे 36 बॅनर्स लावण्यात आले आहे. सदरचे बॅनर्स श्रीराम नगरी अयोध्येत स्वागत करणार असून त्याच्यावर अयोध्येतील मंदिरासह प्रभू श्रीराम हे धनुर्धारी आहेत असे छायाचित्र पाहण्यास मिळत आहे. तर दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री आदित्य योगीनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या छायाचित्रासह शिंदे पिता-पुत्रांचे ही छायाचित्र पाहण्यास मिळत आहे. यानिमित्ताने ठाणेकर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिंदेशाहीचीअनोखी झलक अयोध्येत पाहण्यास मिळणारआहे. मुख्यमंत्री आणि ठाणेकर सुपुत्र असल्याने त्यांचे अयोध्येत आगमन होताना स्वागत झाले पाहीजे म्हणून हा खटाटोप असल्याचे बोलले जात आहे.